सुप्रिया सुळेंकडून स्तुतिसुमने, पुनर्वसनासाठी ज्योती कलानींची धावाधाव

उल्हासनगर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपशी जवळीक साधणाऱ्या ज्योती कलानींना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या पदांवरून दूर केले होते. पुढे त्यांच्याशिवाय दुसरा सक्षम उमेदवार नसल्याने जाहीर केलेला उमेदवार मागे घेत पुन्हा त्यांनाच विधानसभेचे तिकीट दिले. मधल्या काळात कलानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा कलानी कुटुंबाला गोंजारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अंबरनाथ, बदलापूर दौऱ्यावर नुकत्याच आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्योती कलानींवर स्तुतिसुमने उधळली. कलानीही निमंत्रणाशिवाय बदलापूरच्या कार्यक्रमाला हजर झाल्या.

सून भाजपची महापौर आणि मुलगा ‘टीम ओमी’च्या माध्यमातून वेगळी राजकीय चूल मांडत असल्याने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार ज्योती कलानी यांची उल्हासनगरच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली होती. कलानी कुटुंबीयांच्या पक्षनिष्ठेवरून गदारोळ झाल्याने निष्ठावंतांच्या मागणीनंतर ज्योती कलानींना जिल्हाध्यक्षपदावरून दूर सारत हरकिरण कौर धामी यांना जिल्हाध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. ज्योती कलानी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी शहरात निष्ठावंत म्हणून मानले जाणारे भरत राजवानी यांच्याकडे पक्षाची धुरा अप्रत्यक्षपणे देण्यात आली होती. ज्योती कलानी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तिकिटासाठी आग्रही असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भरत राजवानी यांचे नाव पहिल्या यादीत पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीरही केले होते. मात्र ज्योती कलानी यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत अवघ्या काही मतांनी ज्योती कलानी यांचा पराभव झाला, तर भाजपचे कुमार आयलानी पुन्हा आमदार बनले. मध्यंतरीच्या काळात टीम ओमी कलानी यांनी भाजपपासून तर ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर राखले. त्यामुळे ज्योती कलानी सक्रिय राजकारणातून दूर जात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र रविवारी बदलापूर शहरात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ज्योती कलानींनी अचानक हजेरी लावली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही ज्योती कलानी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. कलानी यांनी पक्षासाठी मोठा संघर्ष केला असून त्यांचा कायम सन्मान केला जाईल, असे या वेळी सुळे म्हणाल्या. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसने कलानी कुटुंबीयांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. मेळावा संपताच कार्यक्रमस्थळी सुळे यांनी कलानी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. ज्योती कलानी यांचे पुनर्वसन केले जाणार या चर्चांना या भेटीनंतर उधाण आले आहे. पुढील वर्षी उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या धर्तीवरही कलानी कुटुंबीयांना पक्षातर्फे गोंजारण्याच्या या प्रकाराला वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे.

सिंधी साहित्य अकादमीसाठी प्रयत्न

राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सिंधी साहित्य अकादमीचे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. त्या पदावर नेमणूक करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्यासाठी ज्योती कलानीही इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यासाठीच ही भेट घेतल्याचे बोलले जाते.