नायजेरियन नागरिकांसोबत घरभाडे करार करून स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती न देणाऱ्या ५ स्थानिक नागरिकांवर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पाचही नागरिक प्रगती नगरचे रहिवासी असून पोलीस अशा प्रकारे आणखीन स्थानिक नागरिकांचा शोध घेत आहेत.

पालघर पोलिसांनी नायजेरियन नागरिकांना घर भाडय़ाने देताना त्यांची माहिती पोलिसांना देणे बंधकारक केले होते. यानंतर पोलिसांनी बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात शोधमोहीम सुरू केली होती. मागील आठवडय़ात पोलिसांनी नालासोपारा येथे कारवाई करत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या ६ नायजेरियन नागरिकांना अटक केली होती.

मनाई आदेश लागू असतानाही स्थानिक नागरिकांनी भाडे जादा मिळण्याच्या लालसेने काही नायजेरियन नागरिकांना भाडेतत्त्वावर घरे दिली असल्याचे निदर्शनास आले. असा आदेश असतानाही भाडेकराराची माहिती लपवल्याप्रकरणी प्रगती नगरच्या पाच रहिवाशांना अटक करण्यात आली आहे.

घरमालक बाबा गुप्ता, शबाना फैजल, विशाल कराळे, वसीम नजीम फईम खान, राजीव केशव मोर्या यांच्यावर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.