कल्याण लोहमार्ग न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन २३ ऑगस्टला होणार आहे. परिणामी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या काहीशा अडगळीच्या ठिकाणाहून पक्षकार, वकील आणि न्यायालयात येणाऱ्या संबंधितांची एकप्रकारे सुटकाच होणार आहे. नवीन इमारत कल्याण रेल्वे स्थानकाजवळील प्रशस्त जागेत बांधण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकला लागूनच न्यायालयाची जुनी इमारत आहे. या न्यायालयाच्या अंतर्गत १६ पोलीस ठाणे असून कल्याण ते रोहा, ठाणे, इगतपुरी, लोणावळा, भिवंडी या रेल्वे परिक्षेत्राचा समावेश होतो. या न्यायालयात दररोज सुमारे तीनशे ते चारशे लोक येतात. त्यामुळे सध्या असलेली जागा अपुरी पडते. कोर्ट हॉलमध्ये जेमतेम ४० ते ५० लोकच उभे राहू शकतात. तर वकिलांसाठी छोटीशी खोली या ठिकाणी आहे. न्यायालया बाहेर पक्षकार, पोलीस, आरोपी आदींसाठी फारशी मोकळी जागा उपलब्ध नाही. परिणामी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. हे न्यायालय फलाटालगत असल्याने या ठिकाणी सतत वर्दळ असते. अपुरी जागा कोंदट वातावरण यातून सुटका होऊन, नवीन इमारतीत जाण्याची सर्वजण वाट पाहत होते.
नव्या इमारतीत आधुनिक सुविधा
रेल्वेने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या जागेत न्यायालयाची नवीन इमारत बांधली आहे. या इमारतीमध्ये पक्षकार, पोलीस, आरोपी आदींसाठी मोकळी जागा उपलब्ध आहे. सरकारी वकील आणि अन्य वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. त्याचबरोबर व्हिडीओ कॉन्फरर्न्‍स, ई-कोर्ट, रेकॉर्ड रुम, स्ट्राँग रूम, सहाय्यक अधीक्षक कक्ष, कर्मचारी कक्ष, प्रशस्त कोर्टहॉल बांधण्यात आला आहे. नवीन कोर्ट हॉलमध्ये सुमारे तीनशे लोक एका वेळी उभे राहू शकतात, असे सूत्राने सांगितले.

रेल्वेचे प्रशस्त प्रवेशद्वार
न्यायालयाची जुनी इमारत पाडून प्रवाशांना स्थानकात येणे सुसह्य़ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासन या ठिकाणी प्रवेशद्वार बांधणार आहे, तसेच स्थानकाला नवा साज देण्याचा प्रयत्न रेल्वे करणार आहे. ही जागा रेल्वे स्वत:कडेच ठेवणार असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या जागे लगत असलेली काही दुकानेही हटविण्याची विनंती रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे केली आहे. तसेच रेल्वेच्या प्रवेशद्वाराच्या संकल्पनेबाबत रेल्वे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आधिकाऱ्यांची चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले.