कल्याण-डोंबिवली महापालिकेचा नवा ‘धन-कचरा’ प्रकल्प

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील मागील १५ वर्षांपासून प्रलंबित घनकचऱ्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने नवा प्रयोग हाती घेतला आहे. ओला-सुका कचरा वर्गीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सहज शक्य आहे, असा निष्कर्ष काढत यासंबंधी नवा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या कचऱ्यापासून दरमहा पालिकेला महसुलही उपलब्ध होईल, असे नियोजन केले जात आहे.

घनकचरा व्यवस्थापनात तज्ज्ञ असलेले उपायुक्त रामदास कोकरे यांना या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कल्याण-डोंबिवलीत नियुक्त करण्यात आले आहे. मुख्याधिकारी म्हणून काम करताना कोकरे यांनी वेंगुर्ले, माथेरान आणि कर्जत नगरपालिकांच्या हद्दीत कचरा निर्मूलनाचे यशस्वी प्रयोग केले आहेत. या नगरपालिकांच्या हद्दीत जे प्रयोग करण्यात आले तशाच पद्धतीची आखणी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत केली जात आहे.

रहिवाशांनी यापुढे सोसायटीतील कचरा पालिकेला देताना ओला-सुका पद्धतीने वेगळा करून देणे आवश्यक आहे. ओला-सुका कचरा नियमित उचलला जाईल. सुका कचरा आठवडय़ातून दोन ते तीन वेळा सोसायटीतून उचलला जाईल. सुका कचरा रहिवाशांनी एका डब्यात जमा करून घरात किंवा सोसायटीखालील वाहनतळ, मोकळ्या जागेत आणून ठेवावा. रहिवाशांनी ओला-सुका कचरा विलग करून दिला की पुढील सर्व प्रक्रिया प्रशासन पार पाडणार आहे. सुका कचरा वाहून नेण्यासाठी ठरावीक वाहन नियोजित रस्त्यावरून धावतील. ओला कचरा पालिकेने प्रस्तावित केलेल्या शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्पात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यापासून खत तयार केले जाईल.  सुका कचरा शहरातून जमा करून तो आधारवाडी, उंबर्डे येथे नेऊन तेथे त्यामधील पुठ्ठे, प्लास्टिक, लाकडी सामान, इलेक्ट्रिक टाकाऊ साहित्य, वीज वाहक टाकाऊ तारा असे तत्सम साहित्य कचरा वेचकांकडून वेगळे करून घेतले जाईल. हे साहित्य खरेदी करणारे भंगार विक्रेते यांना विकले जाईल. यामधून जो महसूल मिळेल तो कचरा वेचकांना मानधन, कचराविषयक उपक्रमांसाठी वापरण्यात येईल. यामधून दरमहा चांगली रक्कम पालिकेला उपलब्ध होईल, असे घनकचरा विभाग उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले. ओला-सुका कचरा विलगीकरणासाठी प्रशासनाने गृहसंकुल, सोसायटय़ांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. बहुतांशी सदस्यांनी पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

तर शहर कचरामुक्त

ओला-सुका कचरा शहर स्वच्छतेचा मुख्य गाभा आहे. विलगीकरणाचे प्रश्न सुटले की कचरा समस्या राहत नाही. घरात बसून ओला, सुका कचरा वेगळा करणे रहिवाशांना अवघड नाही. रहिवासी, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागातील सर्वच सहकाऱ्यांचा या प्रकल्पासाठी हातभार लागला तर शहर कचरामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. विलगीकरण केले की कचराकुंडय़ांमधील कचरा हळूहळू कमी होईल. ओला-सुका विलगीकरणासाठी सर्वानीच सहकार्य केले तर आधारवाडीचा कचऱ्याचा हिमालय येत्या काही महिन्यात तो कमी करून दाखवू, असा विश्वास कोकरे यांनी व्यक्त केला.