कल्याण पूर्वेत लाठीने मारहाण; वर्तमानपत्र जप्त

कल्याण : गर्दी होणार नाही व सर्व शासकीय आदेश पाळत कल्याण-डोंबिवली शहराच्या विविध भागांत वृत्तपत्र विक्रेते सकाळी सहा ते १० वाजेपर्यंत रस्त्यावर वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. मात्र गेल्या आठवडय़ापासून कल्याण पूर्वेत कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साध्या वेशातील पोलीस विक्रेत्यांना येऊन ‘वर्तमानपत्र विक्री बंद करा, घरोघरी नेऊन टाका’ अशा प्रकारची दटावणी करीत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तमानपत्र छपाई करा, पण ती करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी टाकू नका. रस्त्यावरील मंचाच्या माध्यमातून विक्री करा, असे यापूर्वी स्पष्ट केले आहे. परंतु, कल्याण पूर्वेतील साध्या वेशातील पोलीस सकाळपासून वर्तमानपत्र विक्रेत्यांना मंच बंद करा असे बजावत आहेत. विक्रेते हातात मोजे, मुखपट्टी लावून व्यवसाय करतात. आजूबाजूला भाजी, काही किराणे दुकाने सुरू असतात त्यांच्यावर कोणतीच कारवाई हे गस्तीवरील पोलीस करीत नाहीत, अशा तक्रारी आहेत.  कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उतेकर हॉटेलजवळ एक वृत्तपत्र विक्रेता अनेक वर्षे व्यवसाय करतो. सकाळी सात ते १० वाजेपर्यंत व्यवसाय करून तो घरी निघून जातो. या विक्रेत्याला गस्तीवरील साध्या वेशातील पोलिसांनी सोमवारी सकाळी लाठीचा जोराचा फटका मारला. ‘तुला वारंवार सांगून तो मंच का बंद करीत नाहीस,’ असे दमदाटीच्या भाषेत बोलून त्या विक्रेत्याची निम्मी वर्तमापत्रे हिसकावून पोलीस गाडीत टाकून घेऊन गेले, असे विक्रेत्याने सांगितले. काटेमानिवली भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांनाही या पोलिसांनी मंच बंद करण्यासाठी दटावणी केली. कल्याण पूर्वेत अनेक ठिकाणी इतर विक्रेते व्यवसाय करीत असताना वृत्तपत्र विक्रेत्यांवर का कारवाई केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वृत्तपत्र विक्री मंच सुरू ठेवायचा असेल तर लेखी परवानगी आणा, असे कोळसेवाडी हद्दीतील एका गस्तीवरील पोलीस अधिकाऱ्याने वृत्तपत्र विक्री अधिकाऱ्यांना सांगितले.

घराबाहेर पडण्यास रहिवाशांना मज्जाव आहे. तरीही लोक वर्तमानपत्र घेण्यासाठी बाहेर कशी पडतात. यासंदर्भात काही घडले असेल तर माहिती घेतो.

-विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण

आयुक्तांनी २३ एप्रिलला काढलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवांचा (औषध दुकान, सिलिंडर पुरवठा, उद्वाहन, दूध) जेवढा उल्लेख आहे तेवढय़ाच सेवांना रस्त्यावर किंवा व्यवसायास मुभा आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी केली जाते. कल्याण पूर्वेत करोना रुग्ण वाढत असल्याने रहिवाशांनी रस्त्यावर येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते.

– भरत पाटील, प्रभाग अधिकारी, कल्याण पूर्व