सीताई बहुउद्देशीय संस्थेची किनारी निवासी शाळा, वांगणी
संसारात अपत्यांचे संगोपन ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते. शिक्षण, नोकरी आणि लग्न अशा टप्प्याने मुले मोठी होऊन कर्ती झाली की आई-वडील प्रापंचिक कर्तव्यापासून काही प्रमाणात मुक्त होत असतात. मात्र ज्यांच्या पदरी विशेष मुले आहेत, त्यांच्यापुढील आव्हान काहीसे वेगळे असते. कारण ती मुले वयाने वाढत असली तरी कधीही मोठी होत नाहीत. लहान मुलांसारखीच त्यांची सदैव काळजी घ्यावी लागते. त्यामुळे अशा विशेष मुलांची देखभाल करण्यातच पालकांची बरीच शक्ती खर्च होत असते. अपुरी जागा, नोकरी-व्यवसाय, इतर अपत्यांचे संगोपन आदी अनेक कारणांमुळे अशा मुलांना घरात ठेवणे अनेकांसाठी गैरसोयीचे असते. पुन्हा आपल्यानंतर काय असा प्रश्नही अशा पालकांच्या मनात असतो. त्यात ते कुटुंब आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील असेल, तर त्यांच्या हालाला पारावार राहत नाही.
वांगणी येथील सीताई बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित किनारा रेसिडेन्शियल स्कूल फॉर चिल्ड्रेन इन नीड ऑफ स्पेशल केअर अशा पालकांसाठी वरदान ठरले आहे. कायम विनाअनुदानित या तत्त्वावर शासनाची मान्यता मिळालेल्या या संस्थेने गोरगरीब घरातील विशेष मुलांना आधार दिला आहे. सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या निवासी व्यवस्था करणाऱ्या संस्था पालकांकडून लाखो रुपये देणगी तसेच हजारो रुपये मासिक शुल्क घेतात. वांगणीच्या या आश्रमात मात्र विशेष मुलांच्या पालकांकडून केवळ हजार रुपये मासिक शुल्क घेतले जाते. सध्या ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी, मुंब्रा, मीरा-भाईंदर आदी परिसरातील दहा ते २५ वयोगटातील ३० विशेष मुले वांगणीतील या संस्थेत आहेत. त्यातील तीन विशेष मुले सकाळी येऊन संध्याकाळी घरी जातात. उर्वरित तिथेच निवासी स्वरूपात राहतात. सर्वधर्मीय मुले येथे गुण्यागोविंदाने राहतात.
अनिता राठोड या संस्थेच्या अध्यक्षा असून त्या स्वत: विशेष मुलांना शिकवितात. समाजसेवा विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले त्यांचे पती कमलाकर राठोड संस्थेत सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतात. नीलमसिंग याही संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात संस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राठोड दाम्पत्याने २००८ मध्ये वांगणीतील एका गाईच्या गोठय़ात दोन मुलांना घेऊन संस्था सुरू केली. गॅस परवडत नसल्याने सुरुवातीची काही वर्षे वखारीतला टाकाऊ लाकूडफाटा आणून चुलीवर अन्न शिजविले. काही महिन्यांतच वांगणी परिसरातील अपंग आणि गतिमंद मुले संस्थेत दाखल झाली. संस्थेला स्वत:ची जागा नाही. गेल्या आठ वर्षांत संस्थेने अकरा ठिकाणी आपला संसार हलविला. चांगल्या कामी आपलाही हातभार असावा, या हेतूने अनेकांनी त्यांना यथाशक्ती मदत देऊ केली. त्यातून संस्थेने तग धरला. विख्यात इंटिरिअर डिझायनर उदयकुमार पिल्ले संस्थेचे एक प्रमुख आधारस्तंभ आहेत. आता व्यवसायातून निवृत्ती पत्करलेले उदयकुमार पिल्ले दररोज बदलापूरहून वांगणीला संस्थेत येऊन विशेष मुलांची विचारपूस, देखभाल करतात. आयुष्याच्या या उतारवयात या मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचे पिल्ले यांनी सांगितले. पिल्ले यांच्या संग्रहात अनेक मौल्यवान दस्तऐवज आहेत. जगभरात केलेल्या कामाचे कौतुक आणि पारितोषिक म्हणून मिळालेल्या या सर्व किमती वस्तूंचा संग्रह त्यांनी संस्थेच्या हितासाठी खुला केला आहे.
दशरथ घुरत, वसंतराव जोशी, शुभांगी ओतुरकर, अलका जोशी, संतोष अय्यर, सुनीलकुमार अय्यर, वाशी आणि बदलापूरचा लायन्स क्लब अशा अनेकांचे सहकार्य संस्थेला लाभते. शनिवार-रविवारी मुंबई-ठाणे परिसरातील युवकांचे विविध समूह संस्थेला भेट देतात. ते मुलांसोबत खेळतात. त्यांच्यासाठी खाऊ आणतात. त्यांना शिकवितात. त्यातून त्यांचा वेळ मजेत जातो.

स्थानिक शेतकऱ्याकडून जागा बक्षीस
गेल्या आठ वर्षांतील संस्थेचे काम पाहून वांगणी गावातील डोणे गावातील एक शेतकरी दीपक दत्तात्रय कुडके यांनी गावात संस्थेच्या वास्तूसाठी दहा गुंठे जागा बक्षीस म्हणून दिली असल्याची माहिती कमलाकर राठोड यांनी दिली. जागेचा ताबा मिळाल्यानंतर स्वत:च्या मालकीची इमारत उभी करणे हे संस्थेचे पुढील मुख्य उद्दिष्ट आहे. हितचिंतकांच्या मदतीने लवकरच संस्था मालकीच्या वास्तूत प्रवेश करील, असा विश्वास राठोड दाम्पत्याने व्यक्त केला आहे.
शिक्षण आणि प्रशिक्षण
मुलांना अगदी अनौपचारिकपणे काही मूलभूत गोष्टी, सवयी शिकविल्या जातात. गाणी, गोष्टी, नाच सर्वच मुले आत्मसात करतात. काही मुले अक्षरेही ओळखतात. त्याचबरोबर त्यांना मेणबत्ती बनविणे, कागदी पिशव्या, प्लास्टिकची फुले बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या मुलांनी काही प्रमाणात हा होईना पण स्वावलंबी व्हावे, हा यामागचा हेतू असतो.