14 October 2019

News Flash

वावर-वांगणीमध्ये शून्य बालमृत्यू

जव्हार तालुक्यातील वावर-वांगणी या अतिदुर्गम भागातील बालमृत्यू रोखण्यास प्रशासनाला अखेर २५ वर्षांनंतर यश आले

(संग्रहित छायाचित्र)

विजय राऊत

२५ वर्षांच्या प्रशासकीय उपाययोजनांना यश

जव्हार तालुक्यातील वावर-वांगणी या अतिदुर्गम भागातील बालमृत्यू रोखण्यास प्रशासनाला अखेर २५ वर्षांनंतर यश आले. या वर्षी या भागात एकही बालमृत्यू झाला नसल्याची नोंद आहे. १९९२-९३मध्ये कुपोषण आणि विविध कारणांमुळे ५०पेक्षा अधिक बालकांचा मृत्यू झाल्याने हा अतिदुर्गम भाग प्रकाशात आला होता.

जव्हार तालुक्यातील वावर-वांगणी या परिसरात बालमृत्यूंची संख्या वाढल्याने २५ वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारचे तिथे लक्ष गेले. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी याबाबीची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी परिणामकारक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. ५०पेक्षा अधिक बालमृत्यू झाल्याने जव्हार येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना करून ग्रामीण भागांमध्ये शासकीय योजना पोहोचवण्यासाठी व्यवस्था आणि देखरेख यंत्रणा उभारण्यात आली. खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून त्याअंतर्गत येथील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरवण्यात आल्या. गरोदर माता व स्तनदा माता यांना आहाराचे आणि चांगल्या आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांच्यामार्फत गरोदर मातांच्या चांगल्या आरोग्याविषयी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली. कोणत्याही समस्येवर वरवर मलमपट्टी करण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे  काम या वेळी करण्यात आले. या घटनेला तब्बल २५ पंचवीस वर्षे होत असून आरोग्य विभागाच्या परिश्रमाला फळ आले आहे.

चार अतितीव्र कुपोषित बालके

वावर-वांगणी क्षेत्रात २०११च्या जनगणनेनुसार ३१०० रहिवासी राहत आहेत. २०१७-१८ या वर्षांत वावर-वांगणीमध्ये ४६ महिलांची प्रसूती झाली. जन्मलेल्या कोणत्याही बालकाचा, तसेच सहा वर्षांपर्यंतच्या बालकाचा या वर्षांत मृत्यू झाला नाही. बालमृत्यू रोखण्यास यश मिळवल्याने जिल्हा परिषदेने गावचे सरपंच, आरोग्य अधिकारी आणि अन्य संबंधितांचा सत्कार केला. वावर-वांगणी आरोग्य उपकेंद्रात सध्या चार अतितीव्र कुपोषित आणि २३ तीव्र कुपोषित बालकांचा समावेश आहे. १९९२-९३मध्ये वावर-वांगणी येथे ५० पेक्षा जास्त बालमृत्यू झाले होते. त्यानंतरही हे प्रमाण प्रत्येक वर्षी कमी-जास्त व्हायचे. परंतु त्यानंतर  ग्रामसेवक, आंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांच्यामार्फत मोठय़ा प्रमाणात गरोदर मातांच्या आरोग्याविषयी जनजागृती घडवून आणली. आरोग्य विभागाने विविध लोककल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे २०१७-१८मध्ये बालमृत्यू रोखण्यात यश आले आहे. या वर्षी या ठिकाणी एकही बालमृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य रतन बुधर यांनी दिली.

आंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांच्यामार्फत गरोदर व स्तनदा माता यांच्या आरोग्याविषयीच्या समस्या वेळोवेळी जाणून घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने निराकरण करण्यात आले. आरोग्य विभागाने विविध योजना राबवून यंदा बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणले.

-डॉ. किशोर देसले, वैद्यकीय अधीक्षक, साखरशेत

First Published on December 7, 2018 12:29 am

Web Title: nil child death in vavar vangani