20 September 2020

News Flash

पाऊले चालती.. : निवांत फेरफटका

गेल्या काही वर्षांपासून या उद्यानाचे रूप पालटण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

निसर्ग उद्यान-२, बदलापूर ( पश्चिम)

बदलापुरातील बहुतेक उद्याने सुस्थितीत असून तिथे सकाळ-संध्याकाळ नागरिकांचा ओढा असतो.  असेच एक उद्यान म्हणजे बदलापूर पश्चिमेतील निसर्ग उद्यान. सुप्रसिद्ध गोविंदधाम आणि भागिरथी प्राइड या सोसायटींना लागून असलेले हे उद्यान गेल्या काही महिन्यांपासून नव्याने विकसित होत आहे. हळूहळू या उद्यानाचे रूप पालटते आहे.

शहराच्या मध्यातून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिन्यांचा खालील भाग हरित पट्टा म्हणून विकसित केला जातो. त्यातूनच या भागात दोन उद्याने विकसित करण्यात आली आहेत. निसर्ग उद्यान- एक आणि दोन या नावाने ती ओळखली जातात.  सात वर्षांपूर्वी या उद्यानांची निर्मिती करण्यात आली होती. आयताकृती असलेल्या या उद्यानाचे आकारमान कमी असले तरी ते अनेक अर्थाने फायदेशीर आहे. बदलापूरचे उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्या प्रभागात येणारी ही उद्याने जवळपास तीन प्रभागांतील नागरिकांसाठी उपयुक्त आहेत. उद्यानासमोरून बदलापुरातील सर्वात मोठा नाला वाहतो. शेजारीच रेल्वे स्थानकाची वर्दळही आहे. तरीही हे उद्यान आपला एकांत जपून आहे. अगदी चिंचोळ्या जागेत तयार केलेले हे उद्यान अनेकांसाठी पहाटेचा गारवा आणि शांतता अनुभवण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. रस्त्याच्या कडेला असलेले हे उद्यान सहजासहजी दृष्टीस पडत नाही. मात्र या उद्यानात प्रवेश केल्यानंतर एक प्रकारचे समाधान मिळते. उद्यानात चांगल्या प्रकारे वृक्ष लावण्यात आलेले आहेत. त्यातील पाम जातीची झाडे या उद्यानाची शोभा वाढवतात. त्यासह इतर विविध प्रकारची फुलझाडे उद्यानाच्या सौंदर्यात भर पाडतात. गेल्या काही वर्षांपासून या उद्यानाचे रूप पालटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात विविध झाडांचे रोपण करून उद्यानाला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

पहाटे सहा वाजल्यापासून हे उद्यान सर्वासाठी खुले होते. मोहनानंद नगर, शनिनगर, पोखरकरनगर अशा भागांतील अनेक नागरिक येथे फिरायला येतात. सकाळी तरुण तरुणींसह ज्येष्ठ नागरिक येथे फेरफटका मारण्यासाठी येत असतात. त्यात महिलांची संख्याही अधिक असते. ज्येष्ठ नागरिक, निवृत्त मंडळी येथे सावकाश चालण्यासाठी येत असतात. उद्यानात चालण्यासाठी कडेला एक जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र चिंचोळा जॉगिंग ट्रॅक असल्याने अनेकदा येथे वेगावर मर्यादा येत असतात. त्यामुळे येथे सावकाश चालण्यासाठीच जॉगिंग ट्रॅकचा वापर केला जातो. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवंडांसह येथे येताना दिसतात. आपल्या रक्ताच्या नात्यांसह एक वेगळे मित्रत्वाचे नाते येथे आल्याने तयार होत असल्याच्या भावना येथे येणारी ज्येष्ठ पुरुष मंडळी सांगतात. येथे फुला, झाडांची माहिती देणारे फलक लावण्यात येणार असून बसण्यासाठी चांगली आसनेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.  त्यामुळे येत्या काळात या उद्यानाचे रूप पालटलेले असेल.

सुखावणारी शांतता

पहाटेच्या वेळी येथे असलेली शांतता मनाला सुखावून जाते. वर्दळीचा रस्ता नसल्याने पहाटेची शांतता इथे अनुभवता येते. मात्र बसण्यासाठी चांगली आसने हवीत.

  – शिल्पा नाहा, गृहिणी.

ताणतणाव दूर होतात

दिवसभर काम करण्यासाठी या उद्यानातून ऊर्जा मिळते. शांतता आणि निसर्गसंपन्न वातावरण ताणतणाव दूर करतात. सुंदर फुलांची झाडे असल्यास त्याचाही फायदा शकतो.

-सुषमा जाधव, गृहिणी.

खुली व्यायामशाळा हवी

येथे फक्त जॉगिंग ट्रॅक आहे. त्यासह एखादी ओपन जिमसारखे साधे व्यायामाचे प्रकार करण्यासाठी साहित्य उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा अनेक तरुण घेऊ  शकतील.

 सागर घनघाव, तरुण.

दिवसाची सुरुवात उत्तम

शांत आणि चांगल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी हे उद्यान उत्तम पर्याय आहे. इथे आल्यामुळे अनेक नव्या गोष्टी आणि चर्चा करता येतात. शरीर आणि मन:स्वास्थ्य चांगले राहते.

-गणेश साळुंखे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2017 2:28 am

Web Title: nisarg udyan 2 in badlapur west
Next Stories
1 पाच कोटी भरा!
2 सामूहिक बलात्कारप्रकरणास वेगळे वळण
3 ऑक्टोबरपासून ठाणे, नवी मुंबईत खाडीसफर
Just Now!
X