गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा निर्णय

वसई किल्ल्यातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी किल्ला संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांसांठी बंद करण्याचा निर्णय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री विशेष मोहीम हाती घेऊन किल्ल्यात येणाऱ्या मद्यपी तसेच जोडप्यांना मज्जाव करण्यात आला.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या वसई किल्ल्यात इंग्रजी नववर्षांनिमित्त ३१ डिसेंबरला दरवर्षी शेकडोंच्या संख्येने लोक मद्यप्राशन करण्यास येतात. न्यायालय, पंचायत समिती कार्यालय, दंडाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वसई किल्ल्यात दरवर्षी व वर्षभर हे प्रकार चालतात. पण कोणत्याही शासकीय विभागातर्फे ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. जंजिरे वसई किल्ल्यातील अडचणी आणि दारूबंदी याबाबत गेल्या काही महिन्यांपासून उपाययोजनेसाठी जागृती होत असतानाच पुरातत्त्व विभागाने एक ठाम पाऊल उचलले. ३१ डिसेंबरच्या रात्री पुरातत्त्व विभाग, किल्ले वसई मोहीम आणि आमची वसई टीमने वसई किल्ल्यात मद्यपान करण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आणि जोडप्यांना रोखले.

पुरातत्त्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत २५ कर्मचाऱ्यांनी रस्ता अडवून मद्यपींना रोखले. जंजिरे वसई किल्ल्यातील वास्तूच्या संरक्षणासाठी नियुक्त असणाऱ्या प्रतिनिधींना गणवेश व ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे दारूबाज व प्रेमी युगले यांच्या थैमानास चोख उत्तर देणे आता शक्य होणार आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कायमस्वरूपी चौकशी व चेक पोस्ट लागल्यास दारूबाज व प्रेमी युगलांचा कायमचा बंदोबस्त करणे शक्य होईल, असे श्रीदत्त राऊत यांनी सांगितले.

सकाळपासूनच मोहिमेस सुरुवात

किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख श्रीदत्त राऊत आणि पुरातत्त्व विभागाने सकाळपासूनच किल्ल्यातील जोडपी आणि मद्यपींना किल्ल्यातून हाकलून दिले. रात्री १० वाजता आमची वसई समूहानेदेखील ही मोहीम हाती घेत सकाळी ५ वाजेपर्यंत पुरातत्त्व विभाग व पालघर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने वसई किल्ल्यात जागता पहारा दिला. या वेळी १०६ चार चाकी व १२३ दुचाकी वाहनांना परत पाठवण्यात आले. अनेक वाहनांमध्ये पोलिसांना व पुरातत्त्व खात्यास मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. एक-दोन व्यक्तींनी राजकीय व प्रशासकीय ओळख दाखवत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना योग्य समज देऊन घरचा रस्ता दाखवण्यात आला.