लोकसत्ता वार्ताहर

वसई : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने साप निघण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेषकरून वसईच्या ग्रामीण भागात साप निघण्याचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीणमध्ये यंदाच्या चालू वर्षांत आतापर्यंत १०१ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी गेले की साप निवारा घेण्याच्या शोधात व अन्नाच्या बाहेर पडतात.त्यामुळे त्यांचा मोठय़ा प्रमाणात वावर हा पावसाळ्यात दिसून येत आहे.वसईच्या भागातील बहुतांश परिसर डोंगराळ व शेतीचा भाग असल्याने या भागात जास्त प्रमाणात विविध प्रजातीचे साप आढळून येत आहेत. यामध्ये नाग, घोणस, मण्यार, फुरसे, यासह इतर प्रजातीचे साप आहेत.

तसेच येथील नागरिक शेताबांधावर मोठय़ा प्रमाणात कामे करतात. त्यामुळे गवत काढताना किंवा इतर कामे करताना  कधी कधी सर्पदंश होण्याच्या घटना घडत असतात.

नुकताच वसई पूर्वेतील टकमक गडाच्या खाली असलेल्या  तरेपाडा या आदिवासी भागात आपल्या झोपडीत राहणारी मालू अनंता तांडेल ही ५५ वर्षीय  महिला झोपडीच्या बाजूलाच सरपणासाठी जमा केलेली सुकी लाकडे काढण्यास गेली असता तेथे अगोदरच लपून बसलेल्या विषारी जातीच्या कोब्रा प्रजातीचा सापाने दंश केल्याची घटना घडली होती. या महिलेवर तातडीने भाताणे  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णराव यादव यांनी तातडीचे उपचार करून तिचे प्राण वाचविले आहेत. अधूनमधून ग्रामीण भागात सर्पदंश होण्याचे प्रकार सुरूच असतात. ग्रामीण भागात १०१ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या.