करोनामुळे राज्य शासनाकडून निधी मंजुरीस विलंब

ठाणे : जिल्हा परिषदेच्या २९२ शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यापैकी १२० शाळांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीच मंजुरी मिळाली असली तरी उर्वरित १७२ शाळांच्या दुरुस्तीसाठी अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ही मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे या शाळांच्या दुरुस्ती कामाला करोनाचा फटका बसल्याचे चित्र असून या शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या तालुक्यांतील ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ३२८ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये विद्याथ्र्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्ना केले जातात. असे असले तरी बहुतांश शाळांच्या इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून अनेक वर्ग खोल्यांमध्ये पडझड झाली आहे. ग्रामीण भागातील अशा २९२ शाळा नादुरुस्त झाल्या आहेत. याबाबतचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा उपस्थित झाला आहे. तसेच शाळा दुरुस्ती आणि नवीन वर्ग खोल्या बांधकामाच्या विषयावरून बांधकाम विभागाचे अधिकारी आणि सदस्यांमध्ये यापूर्वी वादाचे प्रकार घडले आहेत. अखेर २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या १०४ शाळांच्या दुरुस्ती कामाला मंजुरी देण्यात आली. यापैकी निम्म्याहून अधिक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून उर्वरित शाळांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर, यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील १६ शाळांच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे.

 

आरोग्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष

नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अंतर्गत ४९ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे, तर उर्वरित १७२ शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळू शकलेला नाही. यंदा करोनाचे संकट असल्याने राज्य शासन आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे प्रशासनाने इतर विभांगाचा निधीही आरोग्य विभागाच्या कामासाठी वळविला आहे. त्यामुळे इतर विभागांच्या विकासकामांवर त्याचा परिमाण होत आहे. तसेच जिल्ह्यातील १७२ शाळांच्या दुरुस्तीसाठी यंदा निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे या शाळांची दुरुस्ती रखडली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.