शहरातील पाळीव, भटक्या प्राण्यांची मोजणी; कर्मचाऱ्यांना शासनाकडून टॅब

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०व्या पशुगणना कार्यक्रमानुसार मीरा-भाईंदरमध्येही पुढील आठवडय़ापासून पशुगणना सुरू करण्यात येत आहे. पाळीव प्राणी, भटके कुत्रे तसेच इतर प्राण्यांची मोजणी यात करण्यात येणार असून पहिल्यांदाच ही मोजणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून टॅब देण्यात येणार आहेत.

दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येत असते. शहरात घरगुती पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांसोबतच गायी, म्हशी, मांजर, भटके श्वान, आदी प्राण्यांची या वेळी मोजदाद करण्यात येणार आहे. आतापर्यंत पशुगणना कागदोपत्री करण्यात येत असल्याने काही कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर न जाता घरबसल्या माहिती भरण्याचे काम करत असत. परंतु पहिल्यांदाच ही मोजणी ऑनलाइन करण्यात येणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून टॅब देण्यात येणार आहेत. हे टॅब इंटरनेटशी तसेच जीओ टॅगने जोडलेले असल्याने मोजणी कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष जागेवर जाणे आता आवश्यक असणार आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेने पशुगणना करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम निराटले यांच्या देखरेखीखाली १३ आरोग्य निरीक्षक, ६० संगणक चालक यांचे पथक तयार केले आहे. एकंदर २४ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.

पशुगणना कशी?

* मोजणी करण्यासाठी गेलेल्या प्रगणकाने पाळीव प्राणी असलेल्या घरमालकाचे नाव, त्याचा व्यवसाय, इतर तपशील तसेच प्राणी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचे तपशील टॅबमध्ये असलेल्या संकेतस्थळावर नोंद करायचे आहेत.

*  टॅब जीओ टॅग असल्याने ही माहिती प्रगणक ज्या घरात गेला आहे, त्या घरातच बसून ती भरायची आहे आणि लगेचच ती संकेतस्थळावर सादर करायची आहे.

*  एखादे वेळी टॅबमध्ये माहिती भरल्यानंतर इंटरनेट नेटवर्क उपलब्ध नसेल तरीही प्रगणकाला लॉगआऊट करता येणार नाही.

*  जेणेकरून नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर ही माहिती आपोआपच सिंक केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. विक्रम निराटले यांनी दिली.

*  जीपीएस प्रणालीमुळे जमा झालेली माहिती थेट केंद्र सरकारकडे संग्रहित होणार आहे.