पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत आवश्यक असणारे पाणी हे केवळ पावसाच्या माध्यमातूनच मिळते. मात्र पावसामार्फत मिळणाऱ्या दर शंभर लिटर पाण्यापैकी ५५ लिटर पाणी कोणत्याही वापराविना वाहून जाते. ३५ लिटर पाण्याचे बाष्पीभवन होते आणि अवघे दहा टक्के पाणी वापरले जाते. जलसंवर्धनाद्वारे आपण २८ टक्के पाणी अडवू शकतो. त्यासाठी पावसाद्वारे जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पळणाऱ्या पाण्याला चालायला लावा. चालणारे पाणी रांगायला लावा. रांगत असलेले पाणी अडवा. असे केले तरच जमिनीत अधिक प्रमाणात पाणी मुरेल, असे प्रतिपादन भूजलतज्ज्ञ डॉ. सतीश उमरीकर यांनी शहरातील सर्वपक्षीयांनी आयोजित केलेल्या पाणी परिषदेत केले.
सध्या अतिरेकी उपशामुळे भूजलाची पातळी अगदी खोलवर गेली आहे. ३०० फूट खोलवरील पाणी सध्या आपण वापरत आहोत. एकप्रकारे आपण आपल्या नातवाचे पाणी पीत आहोत. मग ती पिढी कोणते पाणी वापरेल, याचा गांभीर्याने विचार करा. पाणी कधीही शिळे होत नाही. त्यामुळे आजचे उरलेले पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देणे अत्यंत चुकीचे आहे. पावसाळ्यातील फक्त १६ दिवस म्हणजेच ३९४ तासच पाऊस पडतो, जे आपल्याला ३६५ दिवस पुरवावे लागते. भविष्यात मोठी धरणे बांधणे अशक्य आहे. त्यामुळे छोटय़ा उपायांनीच पाण्याचे पुनर्भरण आवश्यक आहे. जमिनीवरील फटी, छिद्रे आणि भेगांद्वारे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवा, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी शाळेच्या सभागृहात आयोजित या पाणी परिषदेला शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सामूहिक जलप्रतिज्ञेने या परिषदेची सांगता झाली.