मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झालेला असतानाही गेल्या पाच महिन्यांत शाळांमधून सीसीटीव्ही बसविण्यात आले नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’ने प्रसिद्ध करताच सर्व शाळांमधून सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही तातडीने पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळांमधून सुमारे नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात विद्यार्थिनींची संख्या तीन हजार आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेण्यात आला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मीरा रोड येथील एका खासगी शाळेतील नऊ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच शिक्षकांकडून वर्षभर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला. पालिकेच्या शाळांसोबत शहरातील इतर सर्व खासगी शाळांमधूनही सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करण्याचे या वेळी नक्की करण्यात आले. परंतु या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही.

महापालिकेने स्वत:च्या शाळेत सीसीटीव्ही बसविले नाहीत, शिवाय खासगी शाळांनीदेखील ते बसवले किंवा नाही याची खातरजमा करण्यात आली नाही. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल महापालिकेचे उपायुक्त डॉ. दीपक कुरळेकर यांनी घेतली. कुरळेकर यांनी यासंदर्भात महापालिकेच्या सीसीटीव्ही यंत्रणा विभाग तसेच शिक्षण विभागाला लोकसत्ताच्या वृत्ताचा संदर्भ देत पत्र काढले आहे. महापालिकेच्या शाळांमधून ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही तसेच खासगी शाळांना यंत्रणा बसविण्याबाबत लेखी कळविण्याचे आदेश पत्राद्वारे कुरळेकर यांनी दिले आहेत.