लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूक कोंडीचे केंद्र असलेल्या पलावा परिसरात उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखडय़ास रेल्वेने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुलाच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला असून महिनाभरात अंतिम आराखडय़ाला मंजुरी मिळाल्यावर तात्काळ पुलाच्या कामाला पुन्हा सुरुवात होणार आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कल्याण-शिळ मार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सध्या सुरू असून याच मार्गावर असणाऱ्या पलावा गृहसंकुल परिसरात देसाई खाडी ते काटई टोल नाका अशा उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात आले होते. या उड्डाणपुलाच्या खांबाच्या उभारणीसाठी ४५ ठिकाणी पायाभरणी करायची असून त्यापैकी ३७ ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. तर ४५ खांबांपैकी १२ खांबाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अतिरिक्त २ मार्गिकांसाठी जागा सोडण्याची विनंती हे काम करणाऱ्या प्राधिकरणाने केली होती. ही जागा सोडण्यासाठी उड्डाणपुलाचा आराखडा बदलावा लागला. बदललेल्याआराखडय़ाला आता मंजुरी मिळाली असून अंतिम आराखडाही महिनाभरात मंजूर होणार आहे.