वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचे अचानक काम बंद आंदोलन

विरार : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी, मकरसंक्रांतीच्या दिवशी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे शहरातील बस सेवा ठप्प झाली आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले. वेतनवाढीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते आणि ७००च्या वर कर्मचारी यात सहभागी झाले.

परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी पहाटेपासून आगारात ठिय्या मांडत काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. दिवसभरात एकही बस न धावल्याने प्रवाशांचे हाल झाले. मकरसंक्रांत असल्याने अनेकांनी नातेवाईकांच्या भेटीगाठी घेण्याचे बेत आखले होते. मात्र परिवहनच्या संपामुळे त्यावर पाणी फिरले गेले.

परिवहनच्या संपाबाबत काहीच माहिती नसल्याने अनेक प्रवासी बसथांब्यांवर ताटकळत बसची वाट पाहात होते. मात्र एकही बस धावली नाही आणि संपाबाबत उशिराने प्रवाशांना समजले. अनेकांनी खासगी वाहनांचा आधार घेतला. मात्र रिक्षाचालकांनी संपाचा फायदा उठवत नेहमीपेक्षा अधिक भाडे घेऊन प्रवाशांची एक प्रकारे लूटमार केली.

कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून पगार वेळेवर होत नाही. अजूनही १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून पगार रखडले आहे. आश्वासन देऊनही कोणतीही पगारवाढ ठेकेदाराकडून करण्यात आली नाही. दर सहा महिन्यांनी  ५०० रुपये वाढ देण्याचे ठरले असतानाही मागील सहा महिन्यांपासून ही वाढ देण्यात आली नाही. त्याचप्रमाणे भविष्यनिर्वाह निधीचे पैसे आणि कर्मचारी सोसायटीत कामगाराचे पैसे वर्ग करण्यात आले नाहीत. याबाबत काही दिवसांपासून ठेकेदाराकडे चर्चा सुरू आहे. पण त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने कर्मचारी संपावर गेले असल्याची माहिती श्रमजीवी कामगार संघटनेचे सरचिटणीस पुतळाजी कदम यांनी दिली. जोपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेची एकही बस रस्त्यावर नाही

परिवहन सेवेच्या ताफ्यात १६० बस आहेत. त्यातील सध्या १४० बस रस्त्यावर धावत आहेत. एका बसच्या ३८ फेऱ्या दिवभरात होतात. दिवसातून दररोज एक लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र संपामुळे बुधवारी एकही बस रस्त्यावर धावली नाही. अचानक बंद झालेल्या परिवहन सेवेने मात्र वसईकरांचे मोठे हाल होत आहेत. मुख्यत्वे महामार्ग आणि आसपासच्या गावात जाणत्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. रिक्षाचे अतिरिक्त भाडे देऊन त्यांना प्रवास करावा लागत आहे.

संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी बोलणे सुरू आहे. त्यावर लवकरच तोडगा काढून बससेवा पूर्ववत सुरू  केली जाईल. – प्रितेश पाटील, सभापती, परिवहन सेवा

आमच्या मागण्यांकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नाईलाजाने संपाचे हत्यार उपसावे लागले आहे. रखडलेले वेतन मिळाले नाही तर संप सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. – पुतळाजी कदम, सरचिटणीस, श्रमजीवी कामगार संघटना