डोंबिवली : डोंबिवलीतील कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर गुरुवारी रात्री पदपथावर एका रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला. या भागातील रहिवासी या तडफडणाऱ्या रुग्णाला तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून प्रयत्नशील होते. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, सुरक्षा रक्षकांना घडला प्रकार सांगूनही दोन तास रुग्णाकडे कोणीही फिरकले नसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्याचा जीव गेल्यानंतर दोन तासांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयातून पथक आले.

सुरुवातीला पादचारी वाटणारा हा व्यक्ती शास्त्रीनगर रुग्णालयातील करोना रुग्ण असल्याचे रुग्णालय चौकशीतून उघड झाले. या पादचाऱ्याला नक्की झाले आहे काय? तो करोनाची बाधा झालेला रुग्ण आहे का?  हे परिसरातील रहिवाशांना माहिती नसल्याने कोणीही या पादचाऱ्याला सहकार्य करण्यासाठी पुढे आले नाही. अंगावर व्यक्तिगत सुरक्षा पोशाख नसल्याने कोणीही त्याच्याजवळ जाण्यास तयार नव्हते. तडफडणारा पादचारी मदतीसाठी धावा करीत होता. शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन, तेथील परिचारिकांना सांगून एकही कर्मचारी पादचारीचा जीव वाचविण्यासाठी वेळीच पुढे आला नाही. असे या भागातील झोपडपट्टीतील रहिवासी सांगत होते. त्या पादचाऱ्याचा जीव गेल्यानंतर मग मात्र व्यक्तिगत सुरक्षा पोशाख घालून पालिकेचे पथक दोन तासांनंतर तेथे दाखल झाले, असे रहिवाशांनी सांगितले.

या प्रकरणाच्या माहितीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयातील दूरध्वनीवर, या रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. सुहासिनी बडेकर यांनी माध्यमांना सांगितले, तो रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल होता. इतर रुग्णांच्या सेवेत कर्मचारी व्यस्त असताना त्याचा गैरफायदा घेत रुग्ण बाहेर निघून गेला.

शास्त्रीनगर रुग्णालयातील अनागोंदीची चौकशी करण्याची मागणी आणि येथील वैद्यकीय प्रमुखाची तातडीने उचलबांगडी करण्याची मागणी मनसेचे जिल्हा सचिव प्रकाश माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याशिवाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही याविषयी कळविण्यात आले आहे.