तारापूर औद्योगिक क्षेत्रातून कोणतीही प्रक्रिया न करता सोडल्या जाणाऱ्या घातक वायूंमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवशक्ती संघटनेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मास्क बांधून मोर्चा काढला. कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

औद्योगिक परिसरातील वायुप्रदूषण थांबवण्यासाठी वायू तपासणी यंत्र लावण्यात यावीत आणि हवेत विषारी वायू सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. वायुप्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर महिनाभरात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. बोईसरमधील अनेक संघटना या मोर्चात सहभागी झाल्या.

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यासंदर्भातील प्रतिक्रिया लोकसत्ताने गुरुवारी प्रसिद्ध केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे.