वन विभागाची अनुकूलता

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत सेवा रस्त्यांची निर्मिती करण्यात आली असली तरी या ठिकाणी वन विभागाच्या जागा असलेल्या भागात सेवा रस्त्यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या कामास परवानगी देण्यास वन विभागाने अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे सेवा रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर होणार आहेत.

घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी पालिकेने २००३ मध्ये महामार्गालगत सेवा रस्ते तयार केले. मात्र, पातलीपाडा, डोंगरीपाडा, कासारवडवली आणि गायमुख येथील सेवा रस्त्यांची जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या म्हणजेच वन विभागाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या भागात सेवा रस्त्यांचे काम रखडले आहे. या ठिकाणी वाहतुकीस अरुंद रस्ता असल्याने कोंडी होत असल्याचे चित्र आहे.  महापालिकेने मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठीही सेवा रस्ते खोदले होते. परंतु हे काम झाल्यानंतर खड्डे योग्यरीता बुजविण्यात आले नव्हते. त्यामुळे दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यात वन विभागाच्या जागेमुळे सेवा रस्त्यांचे काम रखडल्याने कोंडीत भर पडत आहे.

दरम्यान, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंग यांची मंत्रालयात भेट घेतली. त्या वेळी महापालिका आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर खासदार आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. वन विभागाच्या जागेवरील सेवा रस्त्याचे काम कसे पूर्ण करता येईल, यावर चर्चा झाली. त्यामुळे आता येथील सेवा रस्त्यांचे काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

सध्या परिस्थिती काय?

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्याच्या मार्गिकेवरील पातलीपाडा येथे ६८ मीटर, डोंगरीपाडा येथे ७२ मीटर, कासारवडवली येथील ३४ आणि गायमुख येथील २८८ मीटरचा भाग वन विभागाच्या अखत्यारीत येतो. या ठिकाणी रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही. मात्र, उर्वरित ठिकाणी रस्त्याचे काम झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते.