आमदारांच्या आंबा महोत्सवासाठी शेतकरी महिलांच्या पिठलं-भाकरी केंद्रावर गंडांतर
गावात पडलेल्या दुष्काळामुळे निर्माण झालेला पोटापाण्याचा पेच सोडवण्यासाठी यवतमाळ येथून आलेल्या महिलांच्या पिठलं-भाकरी केंद्रावर स्थानिक आमदारांच्या आंबा महोत्सवामुळे गंडांतर आले आहे. ठाण्यातील गावदेवी मैदानात झालेल्या ग्राहक पेठेदरम्यान हे केंद्र चालवणाऱ्या महिलांच्या पिठलं-भाकरी केंद्राने ठाणेकर खवय्यांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु, या ठिकाणी नुकत्याच सुरू झालेल्या आंबा महोत्सवातील काही आयोजकांनी आता हे केंद्र बंद करण्यासाठी या महिलांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.
गावदेवी मैदानात काही दिवसांपूर्वी भरवण्यात आलेल्या ग्राहक पेठेमध्ये यवतमाळ तालुक्यातून आलेल्या महिलांनी पिठलं-भाकरी केंद्र सुरू केले होते. या केंद्राला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता पावसाळय़ापर्यंत हे केंद्र चालूच ठेवण्याचा त्यांचा विचार होता. महाराष्ट्र व्यापार पेठ सुरू असताना दुष्काळग्रस्तांसाठी काम करणाऱ्या कमल परेदशी यांनी या महिलांना गावदेवी मैदानात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. महिलांनी तयार केलेल्या पिठलं-भाकरीला ठाणेकर खवय्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन स्टॉलची मुदत २२ मेपर्यंत वाढवून घेतली. त्यामुळे ऐन दुष्काळात या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक आधार मिळाला होता.
परंतु, या केंद्रावर आता गावदेवी मैदानात भरलेल्या आंबा महोत्सवामुळे गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. महोत्सवातील काही आयोजकांनी पिठलं-भाकरीचा स्टॉल बंद करण्याचा तगादा या महिलांकडे लावला आहे. या महिलांचा स्टॉल बेकायदा असून तो हटविण्यात यावा असा आयोजकांपैकी काहींचा आग्रह आहे. राज्यातील एका बडय़ा मंत्र्याचा भाऊ असल्याचे भासवून एक आयोजक या महिलांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी आहेत.
ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यामार्फत दरवर्षी हा आंबा महोत्सव भरविण्यात येतो. मैदानात ऐसपैस पसरणाऱ्या या महोत्सवाला प्रत्यक्षात पिठलं-भाकरी केंद्रामुळे अडथळा येण्याचे कारण नाही. मात्र, तरीही स्टॉल हटविण्यासाठी दमदाटी आणि जबरदस्ती होऊ लागल्याने दुष्काळग्रस्त कुटुंबे हादरून गेली आहेत. यासंबंधीच्या काही तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्या कानावर घातल्या. त्याची दखल घेत महापौरांनी थेट या कुटुंबांची आज भेट घेतलीच, शिवाय पिठलं-भाकरीचा आस्वादही घेतला. त्यामुळे या मुद्दय़ावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

स्टॉलची वीज कापली
चार दिवसांपासून या महिलांना स्टॉल हटवण्यास सांगितला जात आहे. मात्र कमल परदेशी आणि चित्रा जठार या महिलांच्या पुढाकाराने महिलांनी आपला रोजगार सुरू ठेवला आहे. महिलांना अडथळा व्हावा यासाठी स्टॉलला असलेली वीज कापण्यात आली आहे. गावाकडे वीज नसतानाही दैनंदिन व्यवहार करण्याची सवय असल्याने या परिस्थितीतही ठाणेकरांना पिठलं-भाकरी उपलब्ध करून देऊ, असे यापैकी काही महिलांनी सांगितले. दुष्काळग्रस्त महिलांची प्रशासनाला जाणीव नसेल आणि स्टॉल हटवण्याचा दबाव टाकला जात असेल तर दाद मागण्यासाठी या महिलांना घेऊन मंत्रालयाबाहेर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे कमल परदेशी यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त महिलांच्या या पिठलं-भाकरी केंद्राला माझा विरोध नाही. दुष्काळग्रस्त रोजगारासाठी असा प्रयत्न करत असतील तर त्याचे स्वागतच करायला हवे. त्यांना मदतीचा हात पुढे करायला हवा या मताचा मी आहे. या केंद्राला नेमका कुणाचा विरोध आहे हे मला ठाऊक नाही, पण आयोजकांपैकी कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही.
– संजय केळकर, आमदार