ठाणे : बुरखा परिधान करून विवाह करण्यासाठी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला तरुणीसह शुक्रवारी रात्री ठाणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांचेही प्रेमसंबंध होते. मात्र घरच्यांचा विरोध असल्यामुळे घरातून पळून जाऊन विवाह करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दोघांनाही त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अंबरनाथ येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाचे याच भागात राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबध होते. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता.

त्यामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या दोघांनी बुरखा परिधान करून उल्हासनगरहून ठाणे स्थानक गाठले. यादरम्यान, लोहमार्ग पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ते भुवनेश्वरला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती चौकशीत समोर आली. पळून जाताना या दोघांकडे केवळ २० रुपये शिल्लक होते अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणाची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी या दोघांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वसई : समाजमाध्यमावर मैत्री झालेल्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाार केल्याची घटना वसईत उघडकीस आली आहे. १७ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये रत्नागिरी येथे राहणाऱ्या एका युवकाने तिच्याबरोबर फेसबुकवर मैत्री केली. मैत्रीचे रूपांतरण प्रेमात झाले. या नंतर तो युवक तिला मुंबईला वारंवार भेटायला येत असे. लग्नाचे आमिष देऊन तिला  विरार, नालासोपारा, वसई, पालघर इत्यादी ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक सबंध ठेवले आणि नंतर तिची फसवणूक करून फरार झाला. विरार पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.