मीरा रोडच्या दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले

मीरा रोड येथे उघडकीस आलेल्या महिला आणि तिच्या आठ वर्षीय मुलीच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. महिलेच्या प्रियकराने पैशावरून उद्भवलेल्या वादात हे हत्याकांड केले. पोलिसांनी त्याला मंगळवारी सकाळी दहिसर येथून अटक केली आहे. विनायक नूपुर असे या प्रियकराचे नाव आहे.

मीरा रोड येथील गोल्डन नेस्ट भागातल्या सोनम सरस्वती या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घरात दीपिका संघवी आणि त्यांची आठ वर्षीय मुलगी हेतवी या दोघींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले होते. संघवी या घटस्फोटित असल्याने या घरात आपल्या मुलीसह राहात होत्या. त्यांच्या घरी नियमितपणे येणाऱ्या विनायक नूपुर याच्याशी संघवी यांचे निकटचे संबंध होते. अनेक वेळा तो त्यांच्या घरी राहातदेखील असे. विनायक यानेच संघवी आणि त्यांच्या मुलीची पैशावरून झालेल्या वादात हत्या केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली पोलिसांची दोन पथके तपास कामासाठी नियुक्त केली. आसपास चौकशी केली असता २५ जानेवारीच्या रात्री संघवी यांच्या घरातून भांडणाचे जोरदार आवाज येत असल्याची माहिती मिळाली. इमारतीत लावलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केली असता २६ जानेवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एक व्यक्ती आपला चेहेरा झाकून घाईघाईत इमारतीबाहेर पडताना दिसून आली. ही व्यक्ती आदल्या दिवशी रात्री इमारतीत दाखल झाली होती. अधिक चौकशीत ही व्यक्ती संघवी यांच्याकडे नियमित येत असल्याचे समजल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. खबऱ्यांकडून ही व्यक्ती म्हणजे विनायक ऊर्फ विक्की नूपुर असून तो दहिसरला राहतो आणि सध्या तो फरारी असल्याचे पोलिसांना समजले. त्याने त्याचा मोबाइल बंद केला असल्याने संघवी यांची हत्या विकीनेच केल्याचे जवळपास स्पष्ट झाले.

बेपत्ता झालेला विकी आईची सोन्याची साखळी विकून आधी पालघरला, नंतर गोव्याला आणि त्यानंतर शिर्डीला गेला होता. विकी शिर्डीवरून मंगळवारी सकाळी बसने आपल्या घरी दहिसरला येणार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून विकीला अटक केली.

अशी हत्या झाली..

दीपिका आणि विकी हे आधी एकाच ठिकाणी कामाला होते. या ठिकाणीच त्यांची ओळख झाली. त्यानंतर विकीचे नेहमी दीपिका यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. तो त्यांना आर्थिक मदतही करत असे. दीपिका यांची नोकरी सुटल्याने त्यांना आर्थिक चणचण भासू लागली होती. त्यातच विकीची नोकरीही सुटली असल्याने त्याचा खिसाही रिकामाच झाला होता. पैसे न दिल्यास त्रास देण्याची धमकी दीपिका देत होती. यातूनच २५ जानेवारीला रात्री दीपिका व विकी यांचे जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात विकीने दीपिकाचा गळा आवळला, दीपिका यांना मारताना त्यांची मुलगी हेतवी हिने पाहिले, त्यामुळे विकीने हेतवीचाही गळा आवळला. रात्रभर घरात राहून सकाळी साडेसातच्या सुमारास विकी त्यांच्या घरातून निघून गेला.