ठाणे : भिवंडी महापालिकेत बहुमताचे संख्याबळ असतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागला असून या निवडणुकीत खोटा पक्षादेश बजावून नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. त्याआधारे भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश निजामपुरा पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे हा पक्षादेश कुणी तयार केला आणि तो नगरसेवकांपर्यंत कसा पोहोचला, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

भिवंडी महापालिका महापौरपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. महापालिकेत ९० पैकी काँग्रेस नगरसेवकांचे संख्याबळ ४७ इतके आहे. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्यामुळे कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या महापौर, तर त्यांना उघडपणे मदत करणारे काँग्रेसचे इम्रानवली खान हे उपमहापौर झाले. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अन्सारी यांच्या नावाने दोन पक्षादेश निघाल्याने नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. पहिला पक्षादेश काँग्रेसच्या रिषिका राका यांना मतदान करा असा होता, तर दुसरा पक्षादेश कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान करा असा होता.

नेत्यांचे परस्पर विरोधी दावे

कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना मतदान करण्याचा पक्षादेश मिळाला होता आणि त्याद्वारे आम्ही पक्षाच्या आदेशाचे पालन केल्याचा दावा उपमहापौर इम्रानवली यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता. तर रिषीका यांनाच मतदान करण्याचा पक्षादेश काढण्यात आला होता. प्रतिभा पाटील यांना मतदान करा, असा कोणताही पक्षादेश काढला नव्हता. कुणीतरी हा खोटा पक्षादेश तयार केला असून त्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. या संदर्भात अन्सारी यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली असून त्यामध्ये याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीच्या आधारे भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी चौकशी करण्याचे आदेश निजामपुरा पोलिसांना दिले आहेत.

भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत खोटा पक्षादेश काढल्याप्रकरणी काँग्रेस गटनेते हलीम अन्सारी यांनी तक्रार दिली असून या तक्रारीच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश निजामपुरा पोलिसांना दिले आहेत. तसेच याप्रकरणात कुठपर्यंत चौकशी करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत, त्याबाबतही विधि विभागाकडून अभिप्राय घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
– राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, भिवंडी परिमंडळ