चार वर्षांत मोठय़ा प्रमाणातबेहिशेबी मालमत्ता जमविल्याचे उघड

ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घरासह दहा मालमत्तांवर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी छापे टाकले. यामध्ये विक्रांत आणि त्यांची पत्नी अरुणा या दोघांनी चार वर्षांत उत्पन्नापेक्षा १३६.२७ टक्के अपसंपदा जमविल्याचे समोर आले आहे. ही मालमत्ता जमविण्यासाठी विक्रांत यांना त्यांचे सासू-सासरे यांच्यासह आठ कार्यकर्त्यांनी मदत केल्याची बाब तपासात उघड झाली असून, या सर्वाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मालमत्तेच्या मूल्याची आकडेवारी पोलिसांनी जाहीर केली नसली तरी ती दोन ते अडीच कोटींच्या घरात असल्याचे सूत्रांकडून समजते.

ठाणे येथील कासारवडवली भागात बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी सूरज यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली होती. या चिठ्ठीच्या आधारे सूरज यांच्या आत्महत्येप्रकरणी चार नगरसेवकांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या नगरसेवकांचा समावेश होता.  ठाणे पोलिसांच्या विशेष पथकामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या तपासादरम्यान विक्रांत चव्हाण यांनी मालमत्ता जमविल्याची माहिती समोर आली होती. त्या आधारे शुक्रवारी विक्रांत चव्हाण यांच्या घरासह दहा मालमत्तांवर धाडी टाकून झाडाझडती घेतली. त्यामध्ये विक्रांत आणि त्यांची पत्नी अरुणा या दोघांनी  एप्रिल २०१२ ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत त्यांनी अपसंपदा जमविली असून या कालावधीत विक्रांत हे नगरसेवक होते.

नातेवाईकांसह कार्यकर्त्यांवरही गुन्हा..

विक्रांत चव्हाण आणि अरुणा या दोघांना बेहिशेबी मालमत्ता जमविण्यासाठी विक्रांत यांचे सासरे रवींद्रन केशव नायर, सासू शांता रवींद्रन नायर, कार्यकर्ते उमेश मायाप्पा कांबळे, संतोष भानुदास गावडे, प्रकाश काशिनाथ भोसले, भास्कर सुदर्शन गडामी, अनंत घाडगे, महेश शिर्के, परेश रोहित आणि कल्पतरू प्रॉपर्टीजचे उपाध्यक्ष संजय डागा यांनी मदत केल्याची बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे या सर्वाविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईबाबत पोलिसांचे मौन..

विक्रांत चव्हाण यांच्या घरासह दहा मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या धाडीबाबत माहिती देण्यासाठी ठाणे पोलिसांनी एक प्रसिद्घीपत्रक काढले. त्यात विक्रांत आणि त्यांची पत्नी अरुणा या दोघांनी १३६.२७ टक्के बेहिशेबी मालमत्ता जमावल्याचा उल्लेख केला आहे, मात्र ती मालमत्ता नेमकी किती, याबाबत त्यांच्याकडून माहिती देण्यात आलेली नाही. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असतानाही माहिती देणे पोलिसांनी टाळले.