दिव्यात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ

दिवा येथील कचराभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून आग लागली असून परिसरात धूर पसरला आहे. त्यामुळे नागरिकांची घुसमट होत असून सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात वाढणाऱ्या उष्णतेमुळे येथे आग लागते, असे दिवावासीयांचे म्हणणे आहे. कचराभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी अर्थसंकल्पात उपायांची जंत्री मांडणाऱ्या महापालिका प्रशासनाचे नेहमीप्रमाणेच या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.

गेले दोन दिवस दिवा शहरातील कचराभूमीतून आगीचे लोळ उठत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे सुकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने मोठा अपघात होण्याची भीती परिसरातील रहिवासी व्यक्त करत आहेत. कचराभूमीपासून जवळच असलेल्या कोपर स्थानक, पलावा, शीळ, दिवा-मानपाडा रस्ता येथील वायुप्रदूषणात धुरामुळे प्रचंड वाढ झाली आहे. पेटत्या कचऱ्यातून निर्माण होणारे वायू घातक असून त्यामुळे श्वसनाच्या आजारांची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे, असे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही समस्या दर ऑक्टोबरमध्ये उद्भवते असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

दिवा कचराभूमीला लागलेल्या आगीच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे डोळ्यांची जळजळ, फुप्फुसांचे आजार, घसा सुजणे, कान दुखणे, सर्दी, खोकला असे आजार नागरिकांना भेडसावत आहेत.    डॉ. अमर कोकिटकर

कचराभूमीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे काम सुरू आहे. तसेच येथील धुरामुळे होणाऱ्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्याच्या प्रयत्नांत आम्ही आहोत.   संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका