रस्ते काँक्रिटीकरणाला पावसाळ्यानंतर मुहूर्त; निविदांना थंड प्रतिसाद

ठाणे : दरवर्षी चाळण झालेल्या भिवंडीतील रस्त्यांचे यंदा काँक्रीटीकरण व्हावे यासाठी धडपडणाऱ्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे प्रयत्न यंदाच्या पावसाळ्यातही ठेकेदारांच्या असहकारामुळे अपयशी ठरण्याची चिन्हे आहेत.

प्राधिकरणानी भिवंडी शहरातील तब्बल ५२ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची योजना आखली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १२० कोटी रुपयांच्या १२ रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहे. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागावीत यासाठी गेले तीन महिने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र या कामांसाठी ठेकेदारांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने एकाही रस्त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही भिवंडीकरांचा प्रवास खड्डय़ातूनच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्य सरकारने ठाण्यापलीकडे भिवंडी हे विकासाचे मुख्य केंद्र  म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरणास या भागात विविध प्रकल्पांची आखणी करण्याचे आदेश दिले असून याच माध्यमातून मूळ शहरातील सर्व प्रमुख रस्ते काँक्रीटचे करण्यात येणार आहे. मुंबई-ठाण्यापाठोपाठ सरकारने ठाणे-भिवंडी-कल्याण अशा मेट्रो मार्गास नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. याच भागात गोदामांची संख्या लक्षात घेता लॉजिस्टिक पार्कची उभारणी केली जाणार आहे. भिवंडी भागातील काही व्यावसायिक पट्टय़ांचे आरक्षण बदलून औद्योगिक पट्टय़ात वापर बदल करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या माध्यमातून या भागात नव्याने अधिकृत उद्योगांची उभारणी व्हावी असा प्रयत्न आहे. ठाणे-भिवंडीलगत असलेल्या खारबाव, कशेळी पट्टय़ात विकास केंद्राच्या आखणीचाही प्रस्ताव आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर प्रस्तावांची आखणी केली जात असताना मूळ शहरातील रस्त्यांची होणारी वाताहत हे येथील रहिवाशांसाठी नेहमीचे दुखणे ठरले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात खड्डय़ांमुळे या भागात अपघातांचे प्रमाणही वाढले होते. ही तक्रार यंदा दूर व्हावी यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी पुढे येत होती. मात्र भिवंडी-निजामपुरा महापालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रस्त्यांच्या कामासाठी पैसे कोठून उभारायचे, असा प्रश्न उपस्थित होत होता.

रस्त्यांची कामेही पावसाळ्यानंतर

स्थानिक विकास प्राधिकरणाची ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने शहरातील रस्त्यांची कामे एमएमआरडीएच्या माध्यमातून व्हावीत असे आदेश मध्यंतरी काढले होते. यासाठी तीन टप्प्यांत तब्बल ३२० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची परवानगी एमएमआरडीएला देण्यात आली आहे. यात भिवंडी शहरातील ५२ रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १२० कोटी रुपये खर्च करून शहरातील १२ रस्त्यांचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाची विभागणी करण्यात आली. या विभागणीनुसार काढण्यात आलेल्या ३६ कोटींच्या पहिल्याच निविदेला ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे या पुढील कामांविषयी शंका व्यक्त केली जात आहे. भिवंडी शहराच्या विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या निविदा पावसाळ्यापूर्वी खुल्या करून पुढील दोन वर्षांत ही कामे उरकण्याच्या दृष्टीने एमएमआरडीने नियोजन केले असले तरी ठेकेदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने हे नियोजन पूर्णपणे बारगळले आहे. ही पहिल्या टप्प्यातील निविदा असून प्रतिसाद मिळत नसल्यास पुन्हा निविदा मागविल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.