अंबरनाथ : अंबरनाथ, बदलापूर या शहरांत करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस उच्चांक नोंदवू लागल्याने स्थानिक प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरांतील रुग्णालयांत उपलब्ध खाटा अपुऱ्या पडू लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही पालिका प्रशासनांनी खाटांची संख्या वाढवण्याची तयारी चालवली आहे. त्याद्वारे अंबरनाथमध्ये ५०० तर बदलापुरात ३०० खाटा उपलब्ध होणार आहेत. याठिकाणी अतिदक्षता खाटांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे.

अंबरनाथ शहरात मंगळवारी तब्बल ४४७ रुग्णांची नोंद झाली होती. तर बदलापुरातही सरासरी २०० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे दररोज उपचार घेत असलेल्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि त्या तुलनेत उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या या आकड्यात मोठी तफावत निर्माण होत असल्याने खाटा अपुऱ्या पडण्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील पालिका प्रशासनांनी खाटा वाढवण्यास सुरुवात केली आहे.

अंबरनाथच्या दंत महाविद्यालयातील रुग्णालयात ५०० खाटा असल्या तरी त्याची क्षमताही आता संपत आली आहे. त्यामुळे दंत महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या सूर्योदय शाळेत १०० खाटांची सुविधा करण्यात आली आहे. दंत महाविद्यालयातून बरे झालेल्या आणि थोड्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना सूर्योदय शाळेतील रुग्णालयात हलवले जाते आहे. तर दंत महाविद्यालयात अतिदक्षता विभागाची क्षमता १० वरून ४० वर नेण्यात येत आहे. शहरातल्या खुंटवली येथील पालिकेच्या बहुभाषिक शाळेतही सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी २०० खाटांची व्यवस्था केली जाते आहे. महात्मा गांधी विद्यालयात व्यवस्था करण्यासाठी बोलणी सुरू असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. नितीन राठोड यांनी दिली आहे. तर पूर्वेतील स्पर्धा परीक्षा केंद्रात २०० प्राणवायू खाटा आणि २० अतिदक्षता खाटांची व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातल्या खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता खाटा ताब्यात घेऊन ५० खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे.

बदलापूर शहरात सोनिवली येथे सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी ५२०, गौरी सभागृहात २५० तर खासगी रुग्णालयांमध्ये १०५ खाटा उपलब्ध आहेत. त्यातील बहुतांश खाटा भरल्या गेल्या असल्याने पालिकेने आता इतरत्र खाटांची व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शहराच्या पूर्व भागात  जान्वही  लॉन्स येथे १०० प्राणवायू खाटांची उभारणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी दिली आहे. रेनी रेसॉर्ट येथेही २०० खाटांची व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे. लवकरच तेही पूर्ण केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.