मीरा-भाईंदरमध्ये उभ्या वाहनांआड मद्यमेजवान्या, अनैतिक कृत्ये

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला मोठय़ा संख्येने उभ्या करण्यात येणाऱ्या खासगी बस वाहनतळाचा प्रश्न पुन्हा जटिल झाला आहे. या वाहनतळामुळे वाहतूक कोंडी होत आहे, तसेच रात्रीच्या वेळी वाहनांआड उभे राहून मद्यसेवन केले जात आहे. याशिवाय काही तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

मीरा-भाईंदर शहरात अनेक परिसरात खासगी बसगाडय़ा उभ्या करण्यात येत आहेत. या बसगाडय़ा  रस्त्याच्या कडेला उभ्या  करण्यात येत असल्यामुळे  यांचा त्रास  स्थानिकांना सहन करावा लागत आहे. अरुंद रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. सध्या शहरात मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य रस्त्यावरील सुरू असलेल्या या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक प्रमाणात भेडसावत असल्यामुळे अनेक प्रवासी  शहरातील आतल्या रस्त्याचा उपयोग करत आहेत. परंतु या खासगी बसमुळे गाडय़ांना जाण्यास मार्ग मिळत नाही आहे.याशिवाय भाईंदर पश्चिम परिसरातील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ उभ्या करण्यात  येणाऱ्या बसगाडय़ांजवळ अनेक युवक उभे राहून मद्यसेवन करत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत.

करआकारणीची मागणी

उभ्या करण्यात आलेल्या या बसगाडय़ा मुंबईतील खासगी संस्थेच्या असून त्यांना मुंबईत  वाहनतळ  उपलब्ध होत नसल्यामुळे ही वाहने येथे उभी  करण्यात येत आहेत. मीरा-भाईंदर पालिकेच्या मालमतेचा उपयोग होत असल्यामुळे या वाहनांना जागा उपलब्ध करून  देऊन त्यांवर कर आकारण्याची मागणी  आमदार गीता जैन यांनी केली आहे.