कळवा, मुंब्रा येथील वाढत्या वीज थकबाकीमुळे महावितरणचा निर्णय

ठाणे जिल्ह्य़ातील वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध योजनांची आखणी सुरू असली तरी संपूर्ण जिल्ह्य़ामध्ये वीज देयकांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेची बाब ठरत आहे. ठाणे जिल्ह्य़ात वीजग्राहकांनी महावितरणचे २९६ कोटी थकवले असून त्यापैकी ९३ कोटी रुपये केवळ कळवा आणि मुंब्रा या शहरांतील थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही शहरांतील वीज वितरण व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव आखण्यात आल्याचे राज्य विद्युत महामंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.

‘वाढत्या यांत्रिक प्रगतीमुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्याचवेळी राजकीय-सामाजिक कारणांमुळे वीज थकबाकीदारांचे प्रमाणही वाढत आहे.

राज्यात सध्या ३० हजार कोटींची वीज थकबाकी असून त्यापैकी २५ हजार कोटींची थकबाकी शेतकऱ्यांची आहे,’ अशी माहिती पाठक यांनी ठाणे जिल्ह्य़ाच्या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने या थकबाकीची वसुली थांबवण्यात आली आहे, मात्र बिगरशेती वीजग्राहकांची पाच हजार कोटींची थकबाकीही महावितरणसाठी चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

ठाणे जिल्ह्य़ातून महावितरणचे २९६ कोटी रुपये वीजग्राहकांनी थकवले आहेत. ठाणे शहर हे मोठय़ा प्रमाणावर विस्तारत चालले आहे. वाढत्या लोकवसाहतींसोबत येथील उद्योगधंद्यांमध्येही वाढ होऊ लागली आहे. मात्र त्याच तुलनेत ठाण्यात सध्या २५ कोंटींची थकबाकी असल्यामुळे या वाढत्या थकबाकीविषयी थकबाकीदारांकडून सहकार्य होत नसल्याचे महावितरणाकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांत सातत्याने वीजचोरी, बील देयके थकबाकी यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अनेकदा विविध राजकीय आणि सामाजिक कारणांमुळे ही थकबाकी वसूल करणे महावितरणाला जिकिरीचे जाते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या पाश्र्वभूमीवर महावितरणच्या व्यवस्थेचे पुढील तीन महिन्यांत खासगीकरण करण्यात येणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.

कळवा, मुंब्रा वीजचोरीत आघाडीवर

कळवा, दिवा मुंब्रा परिसरात वीजचोरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. या भागांमध्ये पुरविल्या जाणाऱ्या विजेपैकी ४५ टक्के विजेची गळती होते. वीज बिलाची देयके ८० कोटींपर्यंत आहेत. कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांमध्ये जेवढी वीज पुरवली जाते, त्यातील ४२ टक्के विजेची चोरी किंवा गळती होते. उर्वरित ५८ टक्के विजेवर बिल देयकाची आकारणी होते. त्यापैकी या परिसरातील ४५ टक्के ग्राहक बिल देयके भरत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

थकबाकीदारांचे प्रमाण ठाणे जिल्ह्य़ात वाढत आहे. मात्र थकबाकी वसुलीसाठी विविध उपाययोजना ठाणे जिल्ह्य़ात राबवण्यात येत आहे. आमचे अधिकारी हे घरोघरी जाऊन थकबाकी ठेवू नये याविषयी जागृती करत आहेत.  रिक्षातून संदेश देण्यात येत आहे.

– अनिल डोवे, अधीक्षक अभियंता, ठाणे नागरी मंडळ