पितृ पंधरवडय़ामध्ये कोणतेही शुभकार्य करायचे नसते, असा जणू पायंडाच पडलेला आहे. या दिवसात कोणतेही शुभ कार्य केले की, त्यास यश येत नाही, असा गैरसमज पूर्वपरंपार चालत आला आहे. तीच प्रथा कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील सर्वपक्षीय उमेदवारांनी पाळली. उमेदवारी मिळविण्यासाठी विविध जाती, धर्माचे, पंथाचे उमेदवार इच्छुक आहेत. मात्र त्यापैकी एकानेही पितृ पंधरवडय़ाची वेस ओलांडली नसल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीसाठी ६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या कालावधीत पितृ पंधरवडा सुरू असल्याने एकाही पक्षाच्या उमेदवाराचे अर्ज आले नाहीत. शिवसेना, भाजप, मनसे या पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले तर नाहीच, पण काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन, एमआयएम या पक्षांच्याही उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. या कालावधीत उमेदवार अर्ज भरून तो बाद झाला आणि निवडणुकीत पराभूत झालो तर ते पितृ पंधरवडय़ात अर्ज भरल्यामुळेच झाले, असा समज असल्याने या कालावधीत अर्ज भरले जात नाहीत. निवडणुकीसाठी खर्च करायचा आणि पराभूत झालो तर, सगळे मुसळ केरात जाईल या भीतीने उमेदवारांनी अर्ज भरले नाहीत, अशा प्रतिक्रिया विविध पक्षांमधील होतकरू उमेदवारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्या.
या पंधरवडय़ात आपले पूर्वज भूतलावर आलेले असतात. त्यांच्या साक्षीने पुण्यकर्म करण्यास काही हरकत नसते, असा एक समज आहे. पण सगळेच हा पंधरवडा निषिद्ध म्हणून पाळतात. मग आपणच का पुढाकार घेऊन संकट ओढून घ्यायचे, अशाही प्रतिक्रिया काही उमेदवारांनी दिली.

मनसे, काँग्रेस, राष्ट्रावादी, एमआयएम या पक्षांमधील मुस्लीम उमेदवारांनीही या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले नाहीत. बहुजन समाज पक्षाच्या काही उमेदवारांनी मात्र काही प्रभागांमधून या कालावधीत उमेदवारी भरले. शिवसेना, भाजपचे वर्णन नेहमी हिंदुत्वाचा अंगार आणि सोवळ्यातला पक्ष असाच केला जातो. त्यामुळे या पक्षांमधील एकाही उमेदवाराने या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडेही जाण्याचे टाळले.

आता अर्ज आले
सोमवारी पितृ पंधरवडा संपताच मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून शिवसेना, भाजप, मनसेच्या निवडणूक प्रमुखांनी आपल्या उमेदवारांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून उमेदवारी जाहीर झाल्याचे व एबी अर्ज घेऊन जाण्यास सांगितले. मागील सहा दिवसांत गप्प बसलेले सर्व पक्ष पितृ पंधरवडा संपताच निवडणूक प्रक्रियेसाठी गतिमान झाले आहेत. मंगळवारपासून नवरात्रोत्सावाला प्रारंभ झाला. बहुतांशी उमेदवारांनी आपल्या कुलदैवतांचे स्मरण करून आज सकाळपासून पक्ष कार्यालयात धाव घेतली. मिळालेला उमेदवारी अर्ज घेऊन भरण्यासाठी धडपड केली.

कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ पक्ष सुमारे १० ते १२ जागा लढणार आहे. किती जागा लढायच्या यावरून ‘एमआयएम’च्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू होती. अंतिम निर्णय होईपर्यंत उमेदवारी अर्ज भरणे शक्य नव्हते. काही जागा लढण्याचे निश्चित झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर झाला. अन्य कोणतेही कारण अर्ज उशिरा भरण्यामागे नाही.
– अजीज मौलवी, एमआयएम

प्रभागनिहाय उमेदवार निश्चितीचे काम सुरू होते. पक्षनेते उमेदवारीबाबत चर्चा करीत होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते विचारात घेण्यात येत होती. या चर्चेच्या फेऱ्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचा दिवस उजडला.
– इरफान शेख, मनसे