विक्रीतून ८० कोटींचा महसूल मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा

जप्तीच्या कारवाईनंतरही कल्याण-डोंबिवली महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास वर्षोनुवर्षे असहकार दाखविणाऱ्या १२ थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या ११ आणि १५ मार्च रोजी ही लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यातून सुमारे ८० कोटीचा महसूल मिळण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने गेल्या अर्थिक वर्षांत मालमत्ता करातून ३२५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले असून, गेल्या महिन्यापर्यंत मालमत्ता करातून १७५ कोटी रुपयांचा महसूल जमा होऊ शकला आहे. यामुळे मालमत्ता कराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आयुक्त ई. रवींद्रन यांनी आक्रमक भूमिका घेत मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाईचा धडाका लावला. ‘मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करा आणि तरीही कर न भरल्यास त्या मालमत्तांचा लिलाव करा,’ असे आदेशच पालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार मालमत्ता कर भरण्यास असहकार दाखविणाऱ्या १२ थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलावात काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ११ व १५ मार्च रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दुपारी तीन वाजता या मालमत्तांचा लिलाव होणार आहे. ‘ प्रभागाने ३१ जमीन मालक, विकासकांना समन्स बजावले आहेत. यापैकी २ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पालिका अधिकारी  संजय साबडे यांनी दिली.