सीकेपी, एनकेजीएसबी बँकेची फसवणूक प्रकरण

डोंबिवली : सीकेपी, एनकेजीएसबी बँकांच्या डोंबिवली शाखेतून कर्ज घेताना दोन्ही बँकांना अंधारात ठेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतले. कर्ज घेण्यासाठी बँकांमध्ये तारण ठेवलेल्या सदनिका बँकांना पूर्वकल्पना न देता परस्पर ग्राहकांना विकल्या आणि बँकेचे कर्जाचे हप्ते वेळेत फेडण्यात कुचराई केल्याबद्दल रामनगर पोलिसांनी सद्गुरू कन्स्ट्रक्शनचे विकासक जगदीश वाघ यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन आदेशानंतर पोलीस कोठडी सुनावली आहे.

सात वर्षांपूर्वीचे हे आर्थिक फसवणुकीचे प्रकरण आहे. सीकेपी बँकेने या प्रकरणी सप्टेंबर २०१५ मध्ये रामनगर पोलीस ठाण्यात, एनकेजीएसबी बँकेने जून २०१८ मध्ये विष्णुनगर पोलीस ठाण्यात विकासक जगदीश वाघ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सीकेपी बँकेचे व्यवस्थापक रामकृष्ण चव्हाण यांच्या तक्रारीनुसार विकासक वाघ यांनी काही सदनिका व गाळे तारण ठेवली होती. कर्जाचे हप्ते थकवू लागल्याने तारण मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी बँकेला तारण मालमत्ता दस्त नोंदणीद्वारे बेकायदा विकल्याचे लक्षात आले.

सद्गुरू ब्रीक वर्क्सचे जगदीश वाघ आणि त्यांचे भागीदार दत्तात्रय बाळगी यांनी एप्रिल २०१२ मध्ये एनकेजीबीएस बँकेकडे काही सदनिका तारण ठेवत तीन कोटी १० लाखांचे कर्ज घेतले.  २०१५ पासून कर्जाचे हप्ते थकविण्यास सुरुवात केली. बँकेने तारण मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. तेव्हा त्यांना तारण मालमत्ता विकासकाने विकल्या असल्याचे निदर्शनास आले.  वाघ, आळगी यांनी बनावट कागदपत्रांद्वारे संगनमताने फसवणूक करून बँकेची कर्जाऊ रकमेतील दोन कोटी ५० लाखांची फसवणूक केली म्हणून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

मागील सात वर्षांपासून या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू होता. आता या प्रकरणाने गती घेतल्याने वाघ यांच्या चौकशीतून पडद्यामागचे अनेक म्होरके पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

बँकेत तारण ठेवलेल्या सदनिका परस्पर ग्राहकांना विकून बँकेची फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे. यात विकासक जगदीश वाघ यांना अटक करून त्यांचा तपास सुरू केला आहे.

-लक्ष्मण चव्हाण,  पोलीस निरीक्षक

विकासक वाघ यांनी सीकेपी बँकेचे ३० कोटींचे कर्ज थकविले आहे. या कर्ज वसुलीसंदर्भात वाघ यांच्याकडून पोलिसांना ठोस कर्ज फेडण्याची हमी दिली पाहिजे. तोपर्यंत त्यांना जामीन देऊ नये अशी मागणी आम्ही बँकेतर्फे न्यायालयाला करणार आहोत. वाघ याने न्यायालयात सात कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली आहे. ही रक्कम बँकेत जमा झाली तर ठेवीदारांचे हीत जपले जाईल.

-राजेंद्र फणसे ,संचालक, सीकेपी बँक