बदलापूर : चाचणी न करता कोविड दर्जा नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे रुग्ण अनेकदा शेवटच्या टप्प्यात गंभीर होत असल्याचे दिसून आले आहे. अशा रुग्णांचे मृत्यू अधिक होत असल्याने पालिकेसमोर नवे आव्हान उभे आहे. अशा रुग्णालयांना रेमडेसिविर, प्राणवायू पुरवठा करण्यात पालिकेला अडचणी येतात. त्यामुळे या रुग्णालयांना अधिकृत रेमडेसिविर आणि प्राणवायू पुरवण्यासाठी त्या रुग्णालयांनी नोंदणी करण्याचे आवाहन अंबरनाथ नगरपालिकेने केले आहे. तर कुळगाव बदलापूर नगरपालिकाही अशा रुग्णालयांना नोटीस पाठवून नोंदणीसाठी आवाहन करणार आहे.

करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड रुग्णालयांमध्ये खाटा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही अनेक लक्षणे असलेले रुग्ण घरी किंवा कोविड दर्जा नसलेल्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जात असल्याचे दिसून आले आहे. मात्र रेमडेसिविर आणि प्राणवायू पुरवठ्याच्या नव्या धोरणानुसार कोविड दर्जा असलेल्या रुग्णालयांनाच हा पुरवठा केला जातो. त्यामुळे दर्जा नसलेल्या कोविड रुग्णालयांमधील करोनाबाधितांना उपचारासाठी रेमडेसिविर वेळेत मिळत नाही.

अंबरनाथ पालिकेचे नोंदणीसाठी पत्र

अंबरनाथ नगरपालिकेने कोविड दर्जा नसलेल्या तरीही कोविड संशयितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे. गंभीर रुग्णांना रेमडेसिविर आणि प्राणवायूचा पुरवठा करता येत नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांनी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा प्रशासन आणि पालिकेकडे नोंदणीसाठी प्रस्ताव देण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी केले आहे.