प्राथमिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल 

शालेय शिक्षणाचा खालावत जाणारा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षणतज्ज्ञांनी सुचविलेली रचनावादी शिक्षण पद्धत स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून येत्या तीन वर्षांत राज्यातील एकही मूल अप्रगत राहू नये, यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पालघर जिल्ह्य़ाची निवड करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वयंअध्ययन पद्धती वापरण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात येत्या शैक्षणिक वर्षांत पालघर जिल्ह्य़ातील सुमारे दोन लाख मुले-मुली या पद्धतीने अभ्यास करणार आहेत.

प्राथमिक शिक्षणात नवे धोरण राबविण्याची जबाबदारी ग्राममंगल संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. पालघरमधील जिल्हा परिषद तसेच खासगी अनुदानित अशा २२०० शाळांमधील प्राथमिक इयत्तांमधील मुले आता या नव्या स्वयंअध्ययन पद्धतीने अभ्यास करतील. त्यासाठी त्यांना मुबलक शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या अभियानात शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिक्षकांचे रचनावादी पद्धतीचे प्रशिक्षण करणे, त्यांना वर्ग पातळीवर मार्गदर्शन करणे, केंद्र पातळीवर एका नमुना शाळा उभी करणे यासाठी ग्राममंगल संस्था साहाय्य करणार आहे. या धोरणानुसार शालेय वर्गाचे स्वरूप बदलले जाणार आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत एकाच वर्गात विविध विषय विद्यार्थ्यांना शिकविले जातात. ‘ग्राममंगल’ने विषयानुरूप वर्गखोल्यांचा प्रयोग यशस्वीपणे राबविला. नव्या रचनावादी शिक्षण पद्धतीत असे अभिनव वर्ग भरविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे अध्यापन प्रक्रियेत शैक्षणिक साधनांचा वापर केला जाणार आहे.  सध्या डहाणू तालुक्यातील ऐने आणि विक्रमगड येथे शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत.

‘या आराखडय़ात भविष्यकाळातील शिक्षण कसे असावे याचे विस्ताराने विवेचन करण्यात आले आहे. त्यात रचनावादी शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.  पालघर जिल्ह्य़ातील पहिली-दुसरी, त्यानंतर तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवी इयत्तांसाठी ही पद्धत अनुसरली जाईल,’ अशी माहिती ग्राममंगलचे शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी दिली.

या शाळेत काय?

रचनावादी शिक्षण पद्धतीत मराठी, इंग्रजी, गणित आदी विषयानुरूप वर्ग खोल्या असतील. त्या एका वर्गात विशिष्ट विषयाचा सर्व इयत्ताचा अभ्यासक्रम, संबंधित तक्ते, शैक्षणिक साधने, क्रमिक तसेच पूरक पुस्तके आदी उपलब्ध असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयाचे मुबलक संदर्भ वर्गात उपलब्ध असतील. मुले गटागटाने अभ्यास करतील.