रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार
दोन लोकलमधील नेमके किती अंतर आहे, त्याची नेमकी माहिती देणारे ‘सीबीटीसी’ तंत्रज्ञान रेल्वे प्रशासनाने अमलात आणले तर, काही वाढीव लोकल प्रशासनाला मार्गावर आणणे शक्य होईल. या वाढीव लोकलमुळे काही मिनिटांसाठी लोकलमधील गर्दीचे विभाजन करणे शक्य होईल. परंतु रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हे तंत्रज्ञान वापरण्यास अनिच्छुक आहेत, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली.
नवी दिल्ली, कोलकाता येथील मेट्रोच्या परिचलनामध्ये ‘सीबीटीसी’ तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. त्यामुळे कमी वेळात, कमी अंतरात पाठोपाठ मेट्रो प्रवासी सेवा देत असते. रेल्वेचे रुळ आणि नियंत्रण केबीन यांच्यामधील संवादाचे काम ‘सीबीसीटी’ यंत्रणा करते, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेच्या चार, पश्चिम रेल्वेच्या चार आणि हार्बर मार्गावर दोन मार्गिका आहेत. ‘सीबीटीसी’ तंत्रज्ञानाचा वापर केला तर, उपलब्ध मार्गिकांवर अधिक संख्येने लोकल सोडणे शक्य होणार आहे. यासाठी नवीन मार्गिकांची गरज नाही. ही यंत्रणा अमलात आणायची झाल्यास रेल्वेकडे पुरेसे रेक उपलब्ध आहेत, असे हा पदाधिकारी म्हणाला.
‘सीबीटीसी’ तंत्रज्ञान रेल्वेकडे उपलब्ध आहे. रेल्वे प्रशासनाने ठरविले तर या यंत्रणेची अंमलबजावणी होऊ शकते. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प आता कार्यान्वित केला नाही तर पुढे त्याची किंमत वाढत जाणार आहे.
रेल्वे प्रवासी संघटनांचे काही पदाधिकारी गेल्या वर्षी मुंबईत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना भेटले होते. यावेळी त्यांच्याकडे सीबीटीसी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली तर, आहे त्या परिस्थितीत लोकलची संख्या कशी वाढविता येईल, येणाऱ्या काळातील वाढता खर्च कसा वाचविता येईल, याची सविस्तर माहिती दिली.

वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गर्दीवर रेल्वे प्रशासन विचार करीत आहे. प्रवासी संघटना विविध उपाय रेल्वे प्रशासनाला सुचवीत आहे. यामध्ये कोठे तरी मध्यबिंदू शोधला पाहिजे. घटना घडल्यानंतर त्या वेळेपुरती धावाधाव, चौकशा हा उपचार असतो. हे अपघात होणारच नाहीत, अशी कायमस्वरूपी उपाययोजना रेल्वेने करणे आवश्यक आहे. प्रवासी संघटनेच्या सूचनांची गंभीर दखल रेल्वे अधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. ‘सीबीटीसी’ प्रणाली रेल्वेकडे आहे. पण अंमलबजावणी का करत नाही, असा प्रश्न पडतो.
-अनिल जोशीराव, रेल्वे प्रवासी संघटना, पदाधिकारी