पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू

उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यानच्या रुळांवर एका गर्भवती महिलेचा मृतदेह आढळला आहे. महिलेच्या शरीरावर अनेक जखमा असून या महिलेचा मृत्यू रेल्वेतून पडून झाला की धडकेने याचा पोलीस तपास करीत आहेत. तसेच महिलेजवळ एकही ओळखपत्र न सापडल्याने ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास एक २५ वर्षे वयोगटातील गर्भवती महिला विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर पडल्याचे एका व्यक्तीच्या निदर्शनास आले. याबाबत त्या व्यक्तीने रेल्वे पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

महिलेजवळ कोणतेही ओळखपत्र न मिळाल्याने अद्याप तिची ओळख पटलेली नाही. त्यामुळे महिला रेल्वेतून पडली की ती घातपाताचा बळी ठरली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

इतर पोलीस  ठाण्यांशी संपर्क

महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. तसेच आसपासच्या सर्वच पोलीस ठाण्यांना मृत महिलेचे छायाचित्र पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.