राज ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका

ठाणे : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींना केंद्र सरकारने स्वत:च्या बाजूने समाजमाध्यमातून बोलायला लावणे, हे चुकीचे असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नमूद करत भाजप सरकारवर टीका केली.

ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेऊन राजे यांनी चर्चा केली. या बैठकीनंतर त्यांनी केंद्रातील भाजप तसेच महाविकास आघाडीवर टीका केली. शेतकरी आंदोलन हा सरकारच्या धोरणांचा विषय असून तो चीन किंवा पाकिस्तानमुळे देशावर ओढवलेल्या संकटाचा विषय नाही. त्यामुळे हा विषय अभिनेता अक्षयकुमारपर्यंतच मर्यादित ठेवून तिथेच संपवायला हवा होता, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. ती गायिका कोण, तिला कोण ओळखते. ती काही तरी भाष्य करते आणि तिला सरकारही उत्तर देते.  केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा चुकीचा नाही, मात्र त्यात काही त्रुटी असू शकतात. त्यामुळे प्रत्येक मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

वीज देयकांवरून राज्य सरकार लक्ष्य

राज्यातील नागरिकांना भरमसाट वीज देयके आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची यासंदर्भात भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहा आणि ती माझ्याकडे पाठवा असे सांगितले होते. मात्र काही दिवसांनी अदानी आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर राज्य सरकारने वीज देयकामध्ये माफी दिली जाणार नसल्याची भूमिका घेतली. वीज कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम राज्य सरकार करत आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

टोलनाकाप्रकरणी जामीन

नवी मुंबई : राज ठाकरे यांच्या भाषणानंतर वाशी टोलनाका येथे मनसे कार्यकत्र्यांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी वाशी पोलिसांनी राज  यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. राज ठाकरे यांना १५ हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. २०१४ मधील ही घटना आहे.  शनिवारी राज बेलापूर येथे  न्यायालयात उपस्थित होते.