फेरीवाल्यांकडून वर्षाला २ हजार कोटींचा हप्ता मिळतो म्हणून या प्रश्नाबाबत सगळे पक्ष मूग गिळून गप्प बसले आहेत. असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवण्याची हिंमत फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दाखवली, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. भाजप सरकार म्हणजे डरपोक सरकार आहे. सभांना परवानगी द्यायची नाही, वीज घालवायची, केबलचे प्रक्षेपण करायचे हे सरकारला करावे लागते आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेची ताकद मोठी आहे. ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी ही टीका केली. फेरीवाल्यांविरोधात ठाण्यात मनसेकडून चांगल्या प्रकारे आंदोलन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावरही राज ठाकरेंनी  टीका केली. सिंग यांना प्रचंड गुर्मी आहे ते नीट बोलतही नाहीत. परमवीर सिंग यांच्यात हिंमत असेल तर ज्यांनी पोलिसांवर हात टाकले आहेत, जे फेरीवाले महिला आणि माता भगिनींची छेडछाड करतात त्यांच्यावर एक कोटींचे दावे लावून दाखवा असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

मनसेच्या फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनामुळे अनेक लोक आपल्याला धन्यवाद देत आहेत. ‘रेल्वे स्टेशन आणि परिसरात खूप मोकळी जागा आता दिसते आहे’, ‘आम्ही सहज चालू शकतो’, ‘फेरीवाले दिसतच नाहीत’, ‘स्टेशन्सवर फेरीवाल्यांमुळे गर्दी होत नाही’ अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत. ‘आम्ही चालत असताना आमच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहिले जात नाही’ हे माता भगिनी समोर येऊन सांगत आहेत. मग आम्ही आंदोलन केले तर काय चूक केली? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

आम्ही या सगळ्या अनधिकृत फेरीवल्यांना हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यांनी ते केले नाही म्हणून आम्ही आंदोलन केले. आजवर कायदा मोडणाऱ्यांच्या विरोधातच मनसेने आंदोलन केले आहे. निवेदनाची भाषा समजत नसेल तर पर्याय काय उरतो? हायकोर्टाचा आदेश असताना महानगरपालिका आणि प्रशासन ढिम्म असेल तर आम्ही काय करायचे? फेरीवाल्यांना हटवण्याचे काम सरकारला जमले नाही ते मनसेच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवले याचा लोकांना आनंद आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सगळे राजकीय पक्ष अनधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने झाले आहेत, मनसेला आंदोलन केल्याप्रकरणी जाब विचारत आहेत. ‘पदपथविक्रेते’ अशी पदवी बहाल करून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सगळे पक्ष त्यांच्या बाजूने झाले आहेत. हे पक्ष लोकांच्या बाजूने नाहीत. मुंबईत अडीच ते तीन लाख फेरीवाले आहेत, त्यांच्याबाबत मनसे वगळता इतर सर्व पक्षांना कणव आहे. मराठी फेरीवाल्यांचे काय? त्यांना इतक्या वर्षांपासून अधिकृत का करण्यात आलेले नाही? असेही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले.

अनधिकृत फेरीवाले ‘बिचारे’, मग करदाते बिचारे नाहीत का? फेरीवाल्यांशी संबंधित युनियनशी संबंधित असलेल्या दयाशंकर सिंगची मुलाखत पेपरमध्ये छापून आली होती.  दयाशंकर सिंगने त्यात सांगितले होते की २ हजार कोटी रूपयांचा हफ्ता फेरीवाल्यांकडून वाटला जातो. या पैशांसाठीच मनसे वगळता सगळे पक्ष फेरीवाल्यांच्या बाजूने एकवटले आहेत. मनसेला एकटे पाडण्याच प्रयत्न होतो आहे मात्र माझ्यासोबत महाराष्ट्राची जनता आहे हे विसरू नका असेही राज ठाकरेंनी सुनावले.

चित्रपट बंदीवरून नाना पाटेकरांवर टीका
फेरीवाल्यांचा अभिनेते नाना पाटेकर चांगलाच पुळका आला होता. आता ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ या दोन सिनेमांवर बंदी आली तेव्हा नाना पाटेकर का गप्प बसले आहेत असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.