निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने महापालिकेत कोणत्याही विभागातून मागची तारीख टाकून विकास कामांचा प्रस्ताव मार्गी लागू नये म्हणून प्रशासनाने सर्व विभागांतील विकास कामांच्या नोंदणी पुस्तकांवर लाल शेरे मारून ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयुक्त ई. रवींद्रन यांनी अशा प्रकारचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. यापूर्वी आचारसंहिता असली तरी तत्कालीन अधिकारी आयुक्तांना हाताशी धरून मागच्या तारखा टाकून विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करायचे. अशी प्रकरणे जाहीरपणे उघडकीस आली नसली तरी यासंबंधीची उघड चर्चा महापालिका वर्तुळात होत असे. महापालिकेतील ही परंपरा मोडीत काढण्यासाठी सर्व विभागातील विकास कामांच्या नोंदणी पुस्तकांवर लाल शेरे मारून ते बंदिस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या काळात जुन्या तारखांनी काही कामे काढली जाऊ नयेत यासाठी आयुक्त ई. रवींद्रन यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.