स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाची दुरुस्ती; रुळांवरील भागाचे तीन टप्प्यांत काम

वाढत्या प्रवासीसंख्येच्या तुलनेत अपुरे पडू लागल्याने बदलापूर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांवर सकाळ-संध्याकाळ गर्दी होत असतानाच, गुरुवारपासून या गर्दीत भर पडण्याची शक्यता आहे. स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असून ३ सप्टेंबपर्यंत हा पूल पादचाऱ्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र तीन टप्प्यात होणाऱ्या या कामासाठी सुरुवातीला रेल्वे रूळावरील भागाची दुरुस्ती केली जाणार असल्याने काही दिवस पश्चिमेतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेवरील सर्वच रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांचे लेखापरिक्षण करण्यात आले होते. त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकातील सर्वात जुन्या आणि मध्यभागी असलेल्या पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय रेल्वेने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार गुरूवारपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम ३ सप्टेंबरपर्यंत चालणार असून त्यामुळे प्रवाशांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. आधीच रेल्वे स्थानकात असलेले दोन्ही पूल अरुंद असल्याने प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यात महत्त्वाचा पूल बंद केल्यास त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसेल. त्यामुळे सर्व भार अंबरनाथच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलावर पडणार आहे. त्यात सर्वाधिक गर्दीच्या फलाट एक आणि दोनवरून या पुलाला जोडणारा जीनाही अरुंद असल्याने कोंडीत भर पडणार आहे. त्यासाठी रेल्वे पोलीस आणि स्थानक प्रबंधकांनी तयारी पूर्ण केली आहे.

या काळात पादचारी पुलाची कोंडी टाळण्यासाठी अनेक प्रवासी रूळ ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात बदलापूर स्थानकातून जाणाऱ्या जलद रेल्वेगाडय़ांचा वेग ताशी ३० किमी करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे पोलिसांचा पहारा असणार असून यावेळी सातत्याने सूचना, उद्घोषणा केल्या जाणार आहेत.

काय होणार?

* सुरुवातीला रुळावरील पुलाचा मधला भाग दुरुस्त केला जाणार आहे. त्यामुळे फलाट एक, दोन आणि तीनचा संपर्क तुटणार आहे.

* या काळात पश्चिमेतील प्रवासी जिन्याचा वापर करून फलाट एक आणि दोनवर जाऊ  शकणार आहेत.

* फलाट क्रमांक तीनवरून येणाऱ्या प्रवाशांना अंबरनाथकडील पुलाचा वापर करावा लागणार आहे. तसेच फलाट एक, दोनवरून तीनवर जाण्यासाठीही याच पुलाचा वापर करावा लागणार आहे.