बदलापूरचे सौरभ पाटणकर यांच्या संशोधनाची ‘ग्रीन केमिस्ट्री’ नियतकालिकात दखल

सूर्याप्रमाणेच अक्षय ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या जैविक वनस्पतीजन्य पदार्थापासून किफायतशीर दरात अतिसूक्ष्म काष्ठतंतू (नॅनो सेल्युलोज) बनविण्यात मूळ बदलापूरकर,  मात्र आता कॅनडात असणाऱ्या सौरभ पाटणकर आणि स्कॉट रेनेकर या दोन संशोधकांना यश आले आहे. त्यांचे हे संशोधन ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’च्या ‘ग्रीन केमिस्ट्री’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

अतिसूक्ष्म काष्ठतंतू हा पोलादाइतकाच मजबूत, कडक, परंतु वजनाने हलका पदार्थ असून वैद्यकीय साधने आणि अभिशोषक बनविण्यासाठी तो उपयोगात येतो. महागडी वैद्यकीय उपकरणे पर्यावरणस्नेही पद्धतीने किफायतशीर दरात तयार करणे या संशोधनामुळे शक्य होणार आहे. पूर्वी वैद्यकीय साधने बनविण्यासाठी अत्यंत उपयोगी असलेला हा पदार्थ बनविण्यासाठी प्रति ग्रॅम ८० रुपये खर्च येत होता. पाटणकर आणि रेनेकर यांनी विकसित केलेल्या पद्धतीनुसार आता अवघ्या तीन रुपयांत एक ग्रॅम अतिसूक्ष्म काष्ठतंतू बनविणे शक्य झाले आहे. त्यांच्या या संशोधनाची ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’च्या ‘ग्रीन केमिस्ट्री’ या मासिकाने दखल घेतली आहे.

मूळचा बदलापूर येथे राहणारा सौरभ पाटणकर सध्या कॅनडातील युनिव्हसिर्टी ऑफ ब्रिटिश कोलंबियामध्ये ‘अ‍ॅडव्हान्स रिन्युएबल मटेरिअल्स लॅबोरेटरी’त संशोधक म्हणून कार्यरत आहे. मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेत पीएच.डी.चे संशोधन करताना सौरभने विकसित केलेल्या जैविक इंधन बनविण्याच्या प्रक्रियेस २०१५ मध्ये इंडस्ट्रियल ग्रीन केमिस्ट्री पारितोषिक मिळाले होते. आता त्यापुढे संशोधन करत प्राध्यापक स्कॉट रेनेकर यांच्यासह अतिसूक्ष्म काष्ठतंतू बनविण्यात तो यशस्वी झाला आहे.

जैविक वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजे झाडांचे बुंधे, काठय़ा, पाने, लाकडाचे ओंडके, शेतीतून तयार झालेला कचरा इत्यादी. त्या पदार्थाचे स्वरूप जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे मूळ घटक सारखेच आहेत. सामान्यत: हे घटक म्हणजे सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिगनीन; जे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या मिश्रणांनी बनलेले आहेत. त्यामुळे शेतीमधून तयार झालेल्या वनस्पतीजन्य कचऱ्याचे रूपांतर आता जीवनोपयोगी घटकांमध्ये करणे शक्य झाले आहे. संशोधनाच्या या नव्या शाखेला ‘बायोमास वेलोरायसेशन’ म्हणजेच ‘नैसर्गिक जैविक घटक मूल्यवृद्धीची शाखा’ असे म्हणतात.

विशेष म्हणजे वनस्पतीजन्य घटकांपासून अतिसूक्ष्म काष्ठतंतू बनविण्याची ही प्रक्रिया स्वस्त आणि पर्यावरणस्नेही आहे. त्यासाठी उष्णतेची अथवा उच्च दाबाची गरज नाही. पाणी हे माध्यम वापरून अतिसूक्ष्म काष्ठतंतू बनविले जातात. शिवाय ही प्रक्रिया घडत असताना कोणतेही अपायकारक उत्सर्जन होत नाही, असे सौरभ पाटणकर याने सांगितले.

अतिसूक्ष्म काष्ठतंतू हा स्टीलएवढा मजबूत, परंतु  हलका पदार्थ आहे. हे इंधन नाही. त्याचा उपयोग प्रामुख्याने वैद्यकीय साधने बनविण्यासाठी होतो.  मात्र आतापर्यंत हा पदार्थ बनविण्याची प्रक्रिया महाग असल्यामुळे त्याचा उपयोग टाळला जात होता. आम्ही (मी आणि प्राध्यापक स्कॉट रेनेकर) विकसित केलेल्या प्रक्रियेमुळे पर्यावरणस्नेही पद्धतीने अतिशय कमी खर्चात अतिसूक्ष्म काष्ठतंतू बनविणे शक्य झाले आहे.   – सौरभ पाटणकर, संशोधक, युनिव्हसिर्टी ऑफ ब्रिटिश कोलंबिया