|| सागर नरेकर

भात लावणी आणि कापणीवेळी आलेल्या पावसामुळे हजारोंचे नुकसान :– भातशेतीसाठी समृद्ध मानल्या जाणाऱ्या कोकण विभागातील अंबरनाथ तालुक्यातील या शेतीला यंदाच्या वर्षांत पावसाचा दुहेरी फटका बसला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भात लावणीत मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने भात कापणीच्या वेळी हजेरी लावल्याने हाती आलेले पीक नासून गेले आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस भातशेतीसाठी नुकसानकारक ठरला आहे.

अंबरनाथ तालुक्यात प्रतिवर्षी एक लाख क्विंटल भाताचे पीक काढले जाते. येथे रत्न या जुन्या जातीच्या भाताचे पीक घेतले जाते. गेल्या काही वर्षांत कर्जत विद्यापीठातील ३, ७ जाती, कोमल, वायएसआर भाताचे पीक घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळा ऑक्टोबपर्यंत लांबला होता. त्यामुळे खोडकिडा आणि तुडतुडासारख्या किडींनी भातशेतीचे नुकसान केले होते. तालुक्यातील चार हजार हेक्टर शेतीपैकी ५० ते ६० टक्के शेतीला या पावसाचा फटका बसला होता. दसऱ्यानंतर शेतात भाताची कापणी केली जाते. या सर्व काळात परतीचा पाऊ स सुरूच असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तीन दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा या भातशेतीचे नुकसान केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी खबरदारी घेतल्याने अवघ्या ५० ते ६० हेक्टर शेतीला याचा फटका बसला असून नुकसान १० टक्कय़ांपर्यंत असू शकते, असा अंदाज तालुका कृषी अधिकारी सुवर्णा माळी यांनी सांगितले आहे.

दोन दिवसांच्या पावसाने तांदळाचे नुकसान

एका क्विंटल भाताच्या पिकातून ६० ते ६५ टक्के तांदूळ मिळत असतात. त्यात दोन दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ पावसात पीक भिजल्यास त्याला बुरशी लागते. त्यामुळे तांदूळ खाण्यायोग्य राहत नाही. आता अशाच प्रकारे भाताचे नुकसान झाले आहे.