28 October 2020

News Flash

यंत्रमाग कारखान्यांमुळे इमारतींना धोका?

तळमजल्यावरील कारखान्यांमुळे परिणाम होत असल्याचा आरोप

(संग्रहित छायाचित्र)

भिवंडी येथील धामणकर नाक्याजवळील पटेल कंपाऊंड परिसरातील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना असून त्याठिकाणी होत असलेल्या कामामुळे हादरे बसून इमारतीचे बांधकाम कमकुवत झाले, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. या दाव्यामुळे यंत्रमाग आणि लघुउद्योग कारखाने असलेल्या शेकडो इमारतींच्या बांधकामांना धोका असल्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. तर दुर्घटनाग्रस्त इमारतीत कारखाना असला तरी इमारत नेमकी कशामुळे पडली, हे स्पष्ट होऊ शकलेले नसून त्याचा तपास सुरू असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

भिवंडी शहरातील असबीबी कब्रस्तान, तीनबत्ती नाका, नदीनाका, धामणकर नाका, अंजूरफाटा, मंडई, गैबीनगर या परिसरात ४५ हजारांहून अधिक यंत्रमाग कारखाने आहेत. तर, शहरात १० हजारांहून अधिक लघूउद्योग कारखाने आहे. यातील बहुतांश कारखाने बेकायदा रहिवासी इमारतींच्या तळमजल्यावर थाटण्यात आले आहेत. या कारखान्यांपैकी बहुतांश कारखाने चोवीस तास सुरू असतात. तर अनेक लघुउद्योग कारखान्यांमध्ये जड -अवजड यंत्रामार्फत कामे केली जातात. त्यामुळे इमारतींना हादरा बसतो.  सोमवारी कोसळलेल्या जिलानी इमारतीच्या तळमजल्यावर कित्येक वर्षांपासून यंत्रमाग कारखाना होता. याशिवाय, या इमारतीच्या दोन्ही बाजुलाही यंत्रमाग कारखाने होते. चोवीस तास सुरू असलेल्या या कारखान्यांमुळे इमारतीला हादरे बसायचे, असे स्थानिक रहिवाशी समीर कुरेशी यांनी सांगितले. या हादऱ्यांमुळे घरातील भांडी अनेकदा खाली पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. या हादऱ्यांमुळे ४५ वर्षांत इमारतीचे बांधकाम कमकुवत झाल्याचा दावा इमारतीतील अनेक रहिवासी करत आहेत.

जिलानी इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. मात्र, तो गेल्या कित्येक दिवसांपासून बंद होता. या इमारतीचे बांधकाम नेमके कशामुळे कोसळले हे आता सांगणे कठीण आहे.

– डॉ. पंकज आशिया, आयुक्त, भिवंडी- निजामपूर महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:13 am

Web Title: risk to buildings due to spinning mills abn 97
Next Stories
1 शहापूरमध्ये २४ तारखेपासून आठवडाभर जनता कर्फ्यू
2 मुंबई, ठाण्यासह पुण्यात उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
3 भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
Just Now!
X