तलावात दशक्रिया, श्राद्धविधी सुरू; निर्माल्यामुळे तलाव परिसर प्रदूषित

ठाणे येथील येऊर जंगलाच्या सान्निध्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नयनरम्य उपवन तलावाची रया जाण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे स्थानिकांचा विरोध डावलून या ठिकाणी महापालिका दशक्रिया घाट उभारत असतानाच, घाट तयार होण्यापूर्वीच येथे धार्मिक विधी सुरू झाले आहेत. पितृपक्षातील श्राद्धविधीसाठी येथे गर्दी जमत असून विधीनंतर उरलेले निर्माल्य तलावात किंवा तलावाच्या परिसरातच फेकले जात आहे. त्यामुळे तलावात जलप्रदूषण होत आहेच; पण या संपूर्ण परिसराला अवकळा आली आहे.

ठाणे येथील येऊर परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात येतो. निसर्गरम्य येऊर डोंगराच्या पायथ्याशी उपवन तलाव आहे. या तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू असून त्यासाठी तलावाच्या परिसरात विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्याच वेळी येथे वाराणसीच्या धर्तीवर घाट उभारण्याचे कामही सुरू आहे. या घाटावर श्राद्ध आणि दशक्रिया विधी सुरू झाल्यास तलावाचे सौंदर्य लयास जाईल, अशी भीती व्यक्त करत स्थानिकांनी त्याला विरोध केला होता. मात्र, या घाटावर असे विधी होणार नसल्याचा दावा करत पालिकेने काम पुढे रेटले. मात्र, आता घाट अस्तित्वात येण्याआधीच येथे पितृपक्षातील विधी सुरू झाले आहेत.

उपवन तलावाजवळ कोटय़ावधी रुपये खर्चून रंगमंच उभारण्यात आला आहे. तलावाजवळ फेरफटका मारण्यासाठी येणारे नागरिक रंगमंचावर उभे राहून तलावाचे सौंदर्य पाहतात. गेल्या वर्षी पितृपक्षात नागरिकांनी या रंगमंचाचा वापर विधीकार्यासाठी केला होता. याबाबत गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’ने वृत्त दिल्यानंतर हा प्रकार बंद झाला. मात्र, आता नागरिकांनी रंगमंचाऐवजी थेट तलावाजवळ तयार होत असलेल्या घाटावर पितृपक्षातील श्राद्धविधी सुरू केले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, या तलावाच्या परिसराची पाहणी करून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर त्यांनी दिले.