पावसाळा सुरू होऊनही अर्धवट कामांमुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडीत भर

ठाण्यातील वाहतूक कोंडीवर उतारा शोधण्यासाठी गाजावाजा करत सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण प्रकल्पांमुळे यंदाचा पावसाळा ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर रस्ता रुंदीकरणाची कामे पावसाळा सुरू झाल्यानंतरही अपूर्णावस्थेत असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. महापालिका, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिल्या गेलेल्या मुदतीत ही कामे पूर्ण न झाल्याने वाहतूक पोलीसही चिंतेत पडले आहेत.

घोडबंदर भागातून जाणारा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील डांबरी रस्ता जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आला असून या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेल्या या मार्गावर पावसाळ्यात मोठी कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने पोखरण रस्त्यांची कामे हाती घेतली असून त्यापैकी रस्ता क्रमांक एकवरील वर्तकनगर नाक्यावर आणि पोखरण रस्ता क्रमांक दोन वर अनेक ठिकाणी अद्याप कामे सुरू आहेत. पोखरण रस्ता क्रमांक दोनवरील कामे अतिशय मंदगतीने सुरू असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. या कामांच्या ठिकाणी वाहतुकीसाठी चिंचोळा मार्ग शिल्लक असल्यामुळे  यंदाच्या पावसाळ्यात याठिकाणी कोंडी होण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा रुग्णालय ते उथळसर, बाळकुम साकेत रस्ता, माजीवाडा गावातील रस्ता, पंजाब नॅशनल बँक ते मुस चौक, शीळ-महापे रोड येथील रस्त्याची कामे महापालिकेमार्फत सुरू आहेत. या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, अशी वाहतूक पोलिसांना आशा होती. मात्र, पावसाळा सुरू होऊनही रस्त्याची कामे पूर्ण झालेली नसल्यामुळे पोलिसांचाही भ्रमनिरास झाला आहे.

घोडबंदर डागडुजीविनाच..

घोडबंदर भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. या वाहनांमध्ये अवजड वाहनांचाही समावेश आहे. याशिवाय, घोडबंदर भागातील रहिवाशांच्या वाहतुकीसाठी हा एकमेव मार्ग आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच यंदा घोडबंदरच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नसल्यामुळे कोंडीत भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या मार्गावर तीन मार्गिका सिमेंट काँक्रीटच्या आहेत तर उर्वरित दोन मार्गिका डांबरी आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेची जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी डांबरी मार्गिका खोदण्यात आल्या होत्या. मात्र, या कामानंतर खोदण्यात आलेल्या मार्गिकेचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे ब्रह्मांड नाक्यापासून ते पातलीपाडय़ापर्यंत या मार्गिकेची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना केलेली नाही.

तीन उड्डाण पुलांमुळे फटका

ठाणे शहरातील मीनाताई ठाकरे चौक, वंदना एसटी स्थानक, नौपाडा या भागात तीन उड्डाण पूल उभारण्याची कामे सुरू आहेत. या उड्डाण पुलांवर गर्डर उभारणीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार होते. या कामांनंतर गर्डरच्या कामासाठी करण्यात आलेले बॅरिकेडिंग काढण्यात येणार होते. त्यामुळे वाहतुकीसाठी एक अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होणार होती. मात्र, ही कामेही अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे पावसाळ्यात या भागातही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांकडून व्यक्त होत आहे.