वसई  नालासोपारा पूर्वेकडील एका सराफाच्या दुकानात पाच दरोडेखोरांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा घातला. चाकू आणि बंदुकीच्या धाकाने चोरांनी दुकानातील पाच किलो सोने लुटले. नालासोपारा पूर्वेकडील लिंक रोडवरील संजय मनोहरलाल गुंदेचा यांच्या नक्षत्र ज्वेलर्सवर शनिवारी रात्री ५ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. रात्री ८च्या सुमारास दुकान बंद करत असतानाच दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून ५ किलो सोने नेले.

 

मुलीच्या खून प्रकरणी वृद्धाला फाशीची शिक्षा

नगर: स्वत:च्या अल्पवयीन मुलीचा खून केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने इस्लामउद्दीन सद्दीत अन्सारी (वय ६५, रा. प्रसादनगर, राहुरी) याला शनिवारी फाशीची शिक्षा ठोठावली. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी या खटल्याचा निकाल दिला. हा खून प्रतिष्ठेसाठी (ऑनर किलिंग) झालेला असल्याने गंभीर व दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सन २०११च्या निवाडय़ाप्रमाणे आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, हा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल सरोदे यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राहय़ मानत फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या खटल्याच्या सुनावणीत सात साक्षीदारांपैकी तिघे फितूर म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यात इस्लामउद्दीन अन्सारी याची पत्नी सईदा, दुसरी मुलगी या दोन साक्षीदार व आणखी एक पंच असे तिघे फितूर झाले होते. गुन्हय़ाचा तपास राहुरीच्या पोलीस उपनिरीक्षक आर. एस. चव्हाण यांनी केला होता.