News Flash

रुग्णालय की जंगल?

वसई तालुक्यातील एकमेव जिल्हा ग्रामीण रुग्णालय विरार येथे आहे. तीन एकर जागेत हे रुग्णालय वसलेले आहे

विरार येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात झाडेझुडपांची वाढ झाली आहे. रुग्णालयातील शवविच्छेदन एका झोपडीवजा खोलीत केले जात आहे.

विरारच्या जिल्हा रुग्णालयात झाडाझुडपांची वाढ; तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, मात्र सापांचा वावर

वसई तालुक्यातील एकमेव जिल्हा ग्रामीण रुग्णालय जंगली झाडाझुडपांनी वेढलेले आहे. विरारमध्ये असलेले हे रुग्णालय आहे की जंगल इतकी भयावह परिस्थिती येथे आहे. या रुग्णालयात नेहमीच सापांचा वावर असतो. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना मोठा धोका आहे. कर्मचारी तर जीव मुठीत धरूनच येथे काम करत असतात. सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या या रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांचे हाल होत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

वसई तालुक्यातील एकमेव जिल्हा ग्रामीण रुग्णालय विरार येथे आहे. तीन एकर जागेत हे रुग्णालय वसलेले आहे. या रुग्णालयाची इमारत ४५ वर्षे जुनी आहे. हे रुग्णालय ३५ खाटांचे आहे. मात्र रु ग्णालयात अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. दररोज १५० ते २०० रुग्ण या रुग्णालयात येत असतात. परंतु खाटांची संख्या कमी असल्याने अनेक रुग्णांना परत पाठवले जाते. रुग्णालयाच्या आवारात उंच जंगली झाडे वाढली आहेत. त्यात सापांचा वावर असतो. या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना सतत सापांची भीती असते. महिन्याला १५ ते २० सर्पदंशाचे रुग्ण या रुग्णालयात येत असतात. विरोधाभास असा आहे की त्यांना रुग्णालयातच पुन्हा सर्पदंशाची भीती वाटत असते.

रुग्णालयाची दुरवस्था

* सध्या रुग्णालयात केवळ ३ डॉक्टर असून ३५ कर्मचारी आहेत. शंभर खाटांचे रुग्णालय बनवा, असा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

* रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान अद्याप तयार नाही.

* शवागराची सुविधा नाही. शवविच्छेदन एका झोपडीवजा खोलीत केले जाते.

* औषधांचा साठा रुग्णालयात असतो. परंतु अनेक महागडय़ा तपासण्या करण्याची सुविधा नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन त्या करवून घ्याव्या लागतात.

स्त्रीरोगतज्ज्ञाशिवाय प्रसूती

या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकपद गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे. रुग्णालयात अद्याप स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. महिन्याला किमान ४५ महिलांची प्रसूती रुग्णालयात होत असते. स्त्रीरोगतज्ज्ञाशिवाय या प्रसूती होत असतात. आम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ देण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे येथील व्यवस्थापनाने सांगितले. सोनोग्राफीसह अनेक महत्त्वाचे विभाग या रुग्णालयात नाही. त्यामुळे विविध तपासण्यांसाठी गरीब रुग्णांना बाहेरच जावे लागते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 2:59 am

Web Title: rural hospital in vasai surrounded by wild tree
Next Stories
1 चालढकल करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा!
2 वीज मीटर नोंदणी आता मोबाइल अॅपवरून
3 फेसबुकवरील मैत्री महागात
Just Now!
X