उल्हासनगर महापालिकेच्या सेवेत रुजू असलेले १४ कर्मचारी विविध पदांवर शासनाच्या इतर विभागांमध्ये कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन पालिकेच्या तिजोरीतून दिले जाते. पालिकेची आर्थिक स्थिती खालावत असताना अशा इतर कार्यालयांमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बोजा आणखी किती दिवस पालिका उचलणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उल्हासनगर महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांत खालावली आहे. मालमत्ताधारकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या कराचा भरणा ५० टक्क्यांपर्यंतही पोहोचत नाही. त्यामुळे पालिकेच्या अनेक विकासकामांना कात्री लावावी लागत आहे. ही परिस्थिती असतानाच उल्हासनगर महापालिकेत कागदोपत्री रुजू असलेले अनेक कर्मचारी पालिका सोडून इतर कार्यालयांमध्ये सेवा देत असल्याचे समोर आले आहे. त्यात वर्ग तीन प्रकारांतील असे १४ कर्मचारी आहेत. यात वरिष्ठ लिपिक, लिपिक, संगणक चालक, कामगार, सफाई कामगार आणि कारागीर अशा पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक कर्मचाऱ्यांची उल्हासनगर महापालिकेत नियुक्ती झाल्यानंतर रुजू होण्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच ते पालिका सोडून इतर शासकीय कार्यालयामंध्ये रुजू झाले आहेत. यात ३ कर्मचारी मंत्रालयात, ३ कर्मचारी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात, ५ कर्मचारी उल्हासनगर तहसील कार्यालयात, तर ३ कर्मचारी अंबरनाथ तहसील कार्यालयात कार्यरत असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातर्फे देण्यात आली आहे.

इतर कार्यालयात जाण्यासाठी वशिलेबाजी?

इतर कार्यालयांत सोयीचे काम मिळवण्यासाठी अनेक कर्मचारी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांची मदत घेतात. याकामी अनेकदा आर्थिक व्यवहारही होत असतात, अशी चर्चा आहे. सफाई कर्मचारी, कनिष्ठ लिपिक अशा पदांवर काम करण्याची तयारी नसलेले कर्मचारी या पर्यायाची निवड करून स्वत:ची सोयीस्कर व्यवस्था करून घेतात, असे सूत्रांनी सांगितले.

पालिकेतील कर्मचारी इतर शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असल्याचा प्रकार नुकताच समजला आहे. त्या कर्मचाऱ्यांची नेमणूक कोणत्या नियमानुसार झाली आहे. त्याबाबत कोणता लेखी आदेश आहे का याची तपासणी करतो आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल.

– डॉ. राजा दयानिधी, आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका.