कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय; कडोंमपाच्या दोन प्रभागांमध्ये १७ एप्रिलला मतदान
२७ गावच्या सर्वपक्षीय संघर्ष समितीने १७ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या माणेरे-वसार व भोपर-संदप या दोन प्रभागांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. संघर्ष समिती या निवडणुकीत उमेदवार उभा करणार नाही. या पोटनिवडणुकीत अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार उभे केले तरी, त्यांनाही संघर्ष समिती पािठबा देणार नाही, असे समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
२७ गावांची नगरपालिका झालीच पाहिजे, या आग्रहावर समिती ठाम आहे. केवळ शिवसेनेच्या हट्टामुळे आणि मुख्यमंत्र्यांना संघर्ष समितीची २७ गावांमधील ताकद दाखवून देण्यासाठी मागील पालिका निवडणूक समितीला लढवावी लागली. पालिका निवडणुकीत संघर्ष समितीची ताकद समितीने शासनाला दाखवून दिली आहे. त्यामुळे पोट निवडणुकीत संघर्ष समिती उमेदवार उभा करणार नाही. अन्य कोणत्याही पक्षाला समिती पािठबा देणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, ही समितीची भावना विचारात घेऊन ग्रामस्थांनी पोटनिवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. माणेरे, भोपर येथील प्रभागांमधील ग्रामस्थांनी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या दोन प्रभागांमध्ये पोटनिवडणूक होत आहे.