बॉलीवूडमधील अभिनेते मंडळी ही त्यांच्यावेळेप्रमाणे चित्रीकरणाचे वेळापत्रक ठरवत असतात, मात्र मराठी कलाकाराला आजही निर्मात्याच्या वेळेप्रमाणे चित्रीकरणाचे वेळापत्रक सांभाळावे लागते, याचा परिणाम कलाकारांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे मराठी कलाकारांना अनारोग्याचा शाप आहे, असे स्पष्ट मत रविवारी सायंकाळी ठाण्यातील वेध या कार्यक्रमात अभिनेता संजय नार्वेकर याने व्यक्त केले.
पुढे बोलताना नार्वेकर म्हणाले की, विक्रोळीच्या ‘कन्नमवारनगरमध्ये माझे बालपण गेले. तिथेच कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन आयुष्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची आरण्यक व सती या एकांकिका केल्या व या दोन्हींचीही चांगल्या अभिनयाची प्रथम पारितोषिके मला मिळाली, यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र, महाविद्यालयानंतर मी एक वर्ष काम नसल्याच्या अवस्थेत काढले. यावेळी रुईया महाविद्यालयात दिग्दर्शित केलेली एक एकांकिकाही सपशेल आपटली होती. मात्र, मी आत्मविश्वास न गमावता टिकून राहिलो. माझे मित्र व पत्नी यांनी या काळात साथ दिल्याने आपण पुढे जाऊ शकल्याचे त्यांनी सांगितले.